बसमधून दागिने लांबविणारी महिलांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद
पाच दिवसांत गंभीर व किचकट गुन्ह्याचा छडा; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

आनंद इंगळे
सिंदखेड राजा,(प्रतिनिधी):प्रवासादरम्यान बसमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने आणि मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा महिला टोळीचा पर्दाफाश करण्यात बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चार महिला आरोपींना ताब्यात घेत देऊळगाव राजा पोलिसांच्या अभिलेखावर दाखल झालेला पाच दिवसांपूर्वीचा गुन्हा उघडीस आणला.
देऊळगाव राजा ते देऊळगाव मही दरम्यान बसने प्रवास करणाऱ्या फेमिनाबी नूर मोहम्मद यांच्या पिशवीतून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने असलेले पाकीट लंपास केले होते. सदर पाकीटात सोन्याचे १९० मणी असलेली पोत आणि १७ नग पुतळ्या असलेली पोत, असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी चोरीला गेला होता. या फेमिनाबी नूर मोहम्मद यांनी देऊळगाव राजा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्उपनिरीक्षक नितीन मिंड, पोलीस अंमलदार दिगंबर कपाटे, महिला पोलीस अंमलदार वनिता शिंगणे आणि पोलीस अंमलदार मनोज खरडे यांनी तातडीने समातंतर तपास सुरु केला. बस स्थानक परिसर आणि संशयास्पद मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यांकडून माहिती काढून आज ९ फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा परिसरातून चार संशयित महिलांना ताब्यात घेतले. फिर्यादीने उपरोक्त महिलांना ओळखल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांची नावे नंदिनी सुरी गड्डी (वय २२ वर्षे), पार्वती राकेश गड्डी (वय २० वर्षे), कस्तुरी राम गड्डी (वय २० वर्षे) रा. सोलापूर तर लक्ष्मी व्यंकटेश मच्छा (वय २५ वर्षे) रा. माजलगाव) असल्याचे सांगत त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, खामगावचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनात सदर कामगिरी पार पडली.



