‘गण गण गणात बोते’ने निर्मिली आध्यात्मिक उर्जा
धाडनगरीत गजानन महाराजांचा १४८ वा प्रगटदिन सोहळा उत्साहात



सायंकाळच्या सुमारास गावातून वाजत-गाजत ‘श्रीं’च्या पालखीची आणि रथाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. ‘गण गण गणात बोते’या नामस्मरणाने संपूर्ण धाडनगरी दुमदुमून गेली होती. टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तांचा उत्साह यामुळे गावातील वातावरण पूर्णपणे अध्यात्ममय झाले होते. प्रत्येक भक्त या नामस्मरणात तल्लीन झाल्याचे यावेळी दिसून आले. या सोहळ्यामुळे धाडनगरीत श्रद्धा आणि भक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. भक्ती, सेवा आणि सामाजिक सद्भावनेचा संदेश देणारा हा प्रगटदिन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमामुळे परिसरात सकारात्मकतेची आणि आनंदाची लाट पसरली आहे. भक्त परिवाराने घेतलेल्या परिश्रमामुळे हा सोहळा यशस्वी झाला असून ‘महाराजांच्या कृपेने सर्वांचे कल्याण व्हावे,’ अशी भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली. शेगावच्या या महान संतांच्या सत्कर्माचा आणि भक्तीचा सुगंध केवळ महाराष्ट्रात किंवा देशातच नाही, तर आज सातासमुद्रापार परदेशातही दरवळतो. याच भक्तीची प्रचिती या उत्सवामुळे धाडनगरीत देखील आली. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या सर्व पदाधिकाऱ्यानी, सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.




