क्राईम जगत

मलकापूरचा कृषी पर्यवेक्षक ४ हजारांची लाच घेताना पकडला

बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांची खोड काही मोडताना दिसत नसल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांच्या अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मलकापूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक ईश्वर भागवत सावक़ारे (वय ४१ वर्षे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसूल आणि कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार शेतकऱ्याने कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या पूर्व संमतीने मळणी यंत्र खरेदी केले होते. या खरेदी केलेल्या यंत्राचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. हे काम करून देण्यासाठी कृषी पर्यवेक्षक ईश्वर सावकारे याने तक्रारदार शेतकऱ्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
आपले हक्काचे अनुदान मिळवण्यासाठी लाच देणे मान्य नसल्याने, संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (बुलढाणा) यांच्याकडे धाव घेऊन रीतसर तक्रार केली होती. त्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहा फेब्रुवारी २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान, सावकारे यांनी पाच हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती चार हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
दरम्यान, आज ९ फेब्रुवारी २०२६ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मलकापूर ते बोदवड रोडवर असलेल्या पिंपळगाव देवी फाट्यावरील राधास्वामी सत्संग परिसरात सापळा लावला आणि तक्रारदार शेतकऱ्याकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावकारे यास पंचांसमक्ष रंगेहात पकडले. या प्रकरणी आरोपी ईश्वर सावकारे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली मोहीम फत्ते
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, आणि पोलीस उपअधीक्षक (एसीबी, बुलढाणा) भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुसिंगे आणि लक्ष्मीकांत इंगळे, गजानन गाडे, रंजीत व्यवहारे, शैलेश सोनवणे यांनी सदर मोहीम फत्ते केली.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!