स्मार्ट बुलढाणा

जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराविरुद्ध दिव्यांग बांधवांचा अन्नत्याग

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन आक्रमक

बुलढाणा,(प्रतिनिधी): दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील कारभाराविरोधात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आज १० फेब्रुवारी २०२६ पासून दिव्यांग बांधवांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सकांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सकांनी सदर निवेदनाकडे दुर्लक्ष केले. यामुळे संघटनेच्या वतीने स्मरणपत्र देण्यात येऊन रुग्णालयातील काही डॉक्टर आणि दलाल संगनमत करून पैसे घेऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे वाटप करत असल्याचा खळबळजनक आरोप करत सखोल चौकशी करण्यात यावी, दिव्यांग तपासणी कक्षात पारदर्शकता राहावी, यासाठी तेथे “इन कॅमेरा” तपासणी करण्यात यावी, कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. चालता न येणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी पुरेशा व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात यावी. गेल्या ५ ते १० वर्षांपासून दिव्यांग बोर्डावर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची तत्काळ अदलाबदल करण्यात यावी, नवीन प्रमाणपत्रांसाठीचे ऑनलाईन अर्ज रुग्णालयातूनच मोफत भरून देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने दिव्यांग बांधवांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून त्यांनी आज १० फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ केला आहे.

प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पुरी यांच्या नेतृत्वात मुकेश राजपूत, सुरेश सुरोशे, सुरज जंजाळ, महेंद्र मेढे, मोहम्मद निसार मोहम्मद इकबाल, भगवान लेणीकर, श्रीरंग सुरशे, आरिफ खान, जाफर हुसेन, सय्यद जाफर यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव उपोषणात सहभागी झाले आहेत.

 

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!