मलकापुरात जमिनीच्या वादातून मायलेकीवर चाकूने हल्ला
हल्लेखोर मुलगा आणि सुनेविरुद्ध गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): जमिनीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले आणि सख्ख्या मुलाने आणि सुनेने मिळून आई व बहिणीवर चाकूने हल्ला. ही थरारक घटना नुकतीच मलकापूर तालुक्यातील वरखेड येथे घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी मुलगा आणि सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मूळच्या वरखेड येथील रहिवासी असलेल्या वनमाला प्रल्हाद इंगळे (वय ५५ वर्षे) ह्या सध्या सुरत (गुजरात) येथे वास्तव्यास आहे. कौटुंबिक जमिनीच्या वाटणीसंदर्भात बैठक असल्याने त्या वरखेड येथे आल्या होत्या. गावातीलच राजू इंगळे यांच्या घरी मिटींगसाठी जात असताना त्यांना आरोपी कल्पना राजू इंगळे हिने रोखून धरत बळजबरीने मलकापूरला येथे चला, असा आग्रह धरला. त्यांनी मिटींग सोडून मलकापूरला जाण्यास नकार दिला असता, वादाला तोंड फुटले. हा वाद सुरू असतानाच आरोपी राजू प्रल्हाद इंगळे याने सदर ठिकाणी धावत जात आपल्या हातातील चाकूने सख्खी आई वनमाला इंगळे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वनमाला यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या. आईला वाचवण्यासाठी त्यांची मुलगी मध्यस्थी करायला गेली असता, संतापलेल्या राजूने तिच्यावरही चाकूने वार करून तिला जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, त्याने वनमालाच्या नातीला (मुलीच्या मुलीला) फेकून दिले आणि तिलाही चापटबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी वनमाला इंगळे यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कल्पना राजू इंगळे आणि राजू प्रल्हाद इंगळे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार बाळू टाकरखेडे हे करीत आहेत.



