अजय टप
मलकापूर,( प्रतिनिधी): चिखली येथे जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली, तर धामणगाव बढे येथे शेतीच्या वादातून एका वृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दुसरीकडे मेहकरमध्ये भरधाव वाहनाने धडक दिल्याने एक वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या आणि अपघाताच्या घटनांमध्ये जिल्ह्यात चांगलीच वाढ झाल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.
चिखली: किन्होळा येथे एका तरुणाला उपोषणाचा राग धरून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. चांडोळ (ता.बुलढाणा) येथील अमोल आत्माराम सोनोणे (वय ३० वर्षे) हे आरोपी ज्योत्स्ना कुटे हिला सोडण्यासाठी जात होते. ज्योत्स्ना कुटे हिने फोनवर बोलण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली. त्याच वेळी आरोपी समाधान विठोबा अंभोरे आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी अमोलवर लोखंडी रॉड आणि फायबर पाईपने हल्ला केला. “तू माझ्याविरुद्ध उपोषणाला बसशील तर तुझा काटा काढू,” अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अनिल वाघ हे करीत आहेत.
धामणगाव बढे: धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उबाळखेड येथे शेतीच्या बांधावरून दोन गटात वाद झाला. ६० वर्षीय वृद्ध महिला सिंधुबाई सुखदेव मोरे या आपल्या शेतात गेल्या असता, शेजारील शेतकरी गजानन नारायण लोखंडे आणि नारायण दाजीबा लोखंडे यांनी खड्डा खोदल्याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. “तुला याच गठ्ठ्यात बुजवून टाकीन,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन पाटील हे करीत आहेत.
मेहकर: मेहकर शहरातील इंद्रप्रस्थ हॉटेल समोर एका भीषण अपघातात ६९ वर्षीय गजानन उत्तमराव गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री बस स्टँडवरून घरी जात असताना एका टाटा बलकर ट्रक क्रमांक एमएच-३४-बीझेड-९०५६ ने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात गायकवाड यांचा उजवा पाय फॅक्चर झाला असून छातीला गंभीर मार लागला आहे. त्यांच्या गाडीचेही १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अज्ञात बलकर चालकाविरुद्ध मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुरेश काळे हे करीत आहेत.