
बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा येथे आज १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. बुलढाण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
या नव्या सुविधेमुळे कारागृहात बंदिस्त असलेल्या बंद्यांशी तसेच तालुकास्तरीय न्यायालयात उपस्थित असलेल्या साक्षीदारांची साक्ष थेट न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविणे शक्य होणार आहे. त्यामुळे न्यायप्रक्रियेला गती मिळून वेळ व खर्चाची बचत होण्यास मदत होणार आहे. सदर कार्यक्रमास किरण पाटील, जिल्हाधिकारी, बुलढाणा, विजय सावळे, अध्यक्ष, वकिल संघ, बुलढाणा, मा. सर्व न्यायाधीश, मा. डॉ. लता बाहेकर, विधीज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी. नितीन एन. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांनी विशेष परिश्रम घेतले.
समुपदेशन कक्षाचाही श्रीगणेशा
दरम्यान, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा येथे आज दुपारी २.०० वाजता समुपदेशन कक्षाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी मा. किरण पाटील यांच्या हस्ते कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून न्यायालयात प्रलंबित असलेले कौटुंबिक वाद तसेच इतर दिवाणी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यास मदत होणार आहे. यामुळे न्यायप्रक्रियेला गती मिळून संबंधित पक्षांना सुलभ, वेगवान व सौहार्दपूर्ण मार्गाने न्याय मिळण्यास हातभार लागेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.



