दिव्यांग तरुणावर लोखंडी पाईपने हल्ला
दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल; जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील घटना

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे जुन्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन एका दिव्यांग तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे सुनगाव परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दिव्यांगावर झालेल्या या हल्ल्याबाबत परिसरात संताप व्यक्त होत असून दिव्यांग संघटना आक्रमक झाल्या आहेत.
सुनगाव ता. जळगाव जामोद येथील रहिवासी असलेला परमेश्वर अरुण कपले (वय २८ वर्षे ) हा तरुण दिव्यांग असून वेल्डिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास परमेश्वर गावातील वैभव लाड यांच्या घरासमोरून जात असताना, जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी परमेश्वरला गाठले. आरोपी प्रदीप सिताराम कपले आणि पुंडलिक सिताराम कपले (दोन्ही रा. सुनगाव) यांनी परमेश्वरला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. नव्हेतर आरोपी पुंडलिक कपले याने आपल्या घरातून लोखंडी पाईप आणला आणि परमेश्वर यांच्या उजव्या पायाच्या घोट्यावर मारला. या हल्ल्यात परमेश्वर गंभीर जखमी झाला. मारहाणीनंतर आरोपींनी “तू आम्हाला पुन्हा दिसल्यास तुला जीवाने ठार मारून टाकू”, अशी धमकी दिली.
याप्रकरणी परमेश्वर कपले यांनी जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींनी विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) आणि अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६ चे कलम ९२ (अ), ९२ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे हे करीत आहेत.



