किरकोळ वाद, जातिवाचक शिवीगाळ आणि अॅट्रॉसिटी
ईलोरा शिवारातील घटना; जळगाव जामोद पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : शेतात ढोरं चारण्याच्या किरकोळ वादातून हाणामारी झाली. नव्हेतर वादाचे रूपांतर जातीयवाचक शिवीगाळ आणि जीवने ठार मारण्याच्या धमकीपर्यंत गेल्याची घटना ईलोरा शिवारात घडली. याप्रकरणी नितीन नारायण गायकवाड (वय ४९ वर्षे) यांनी जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील ईलोरा येथील रहिवासी असलेले नितीन गायकवाड हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता ते बटाईने घेतलेल्या आपल्या शेतात गेले होते. त्यावेळी त्यांना आरोपी ज्ञानेश्वर मधुकर तीजारे हा त्यांच्या शेतात गुरे चारताना दिसला. गायकवाड यांनी त्याला “माझ्या शेतात ढोरं चारू नको” असे समजावून सांगितले असता, त्याला राग आला आणि त्याने जुना वाद उकरून काढला. “मागे तुम्ही माझ्या शेतातून ट्रॅक्टर नेले होते,” असे म्हणत नितीन गायकवाड यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. गायकवाड यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीचा राग शांत झाला नाही. दरम्यान, नितीन गायकवाड हे आपल्या पत्नीसह आरोपींच्या घरासमोरून जात असताना, आरोपी ज्ञानेश्वर तीजारे, प्रमीला तीजारे आणि मधुकर तीजारे या तिघांनी त्यांना रस्त्यात अडवले. तिन्ही आरोपींनी गायकवाड आणि त्यांच्या पत्नीला उद्देशून अत्यंत खालच्या पातळीवर जातीयवाचक शिवीगाळ केली. तसेच आरोपी प्रमीला तीजारे हिने देखील गायकवाड यांच्या पत्नीला जातीवरून टोचून बोलत “तुला चांगला हिसका दाखवतो”, अशी धमकी दिली. तर मधुकर तीजारे याने “तुम्ही हलकट जातीचे आहात” असे म्हणत फिर्यादीचा अपमान केला. एवढ्यावरच न थांबता आरोपी ज्ञानेश्वर याने गायकवाड यांच्या बैलाला काठीने मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी नितीन गायकवाड यांनी जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २९६, १२६ (२) अॅट्रॉसिटी कायद्याचे कलम ३ (१)(आर)(एस), ३ (२)(व्हीए) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मलकापूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन हे करीत आहेत.



