क्राईम जगत

शाब्बास “एलसीबी”! २७ गुन्ह्यांतील “मोस्ट वॉन्टेड” पकडला

८ लाखांचा मुद्देमालही केला जप्त; खामगाव आणि शेगाव शहर येथील गुन्हे उघडकीस

बुलढाणा, (प्रतिनिधी) : फक्त बुलढाणा जिल्हाच नव्हे तर राज्यातील विविध जिल्ह्यात घरपोडीच्या गुन्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीला जालना येथून बेड्या ठोकत त्याच्याकडून चोरीचे सोने, एक स्कोडा कार आणि मोबाइल, असा एकूण ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पकडण्यात आलेला आरोपीने राज्यभरात तब्बल २७ गुन्हे केले असून तो आजवर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांचे कुलूप तोडून चोरी होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून घरातील कपाटातून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी खामगाव शहर आणि शेगाव शहर पोलिसांच्या अभिलेखावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक सपकाळे, पोलीस अंमलदार एजाज खान, अमोल शेजोळ, विक्रांत इंगळे, अजिस परसूवाले, भीमराव वानखेडे, गणेश कोल्हे, अंकुश गुरुदेव, राहुल थारकर, तांत्रिक विश्लेषक ऋषी खंडेराव आणि चालक शिवानंद हेलगे यांच्या तपास पथकाने तपासचक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढली असता, आरोपी जालना येथील सदर बाजार परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता जालनास्थित सदर बाजार गाठून आरोपी संजयसिंग कृष्णासिंग भादा (वय ३० वर्षे) रा. गुरु गोविंद नगर (जालना) याच्या मुसक्या आवळल्या. यातील दुसरा आरोपी विजयसिंग कृष्णासिंग भादा (वय ४५ वर्षे) हा फरार होण्यात यशस्वी झाला. यावेळी आरोपीच्या ताब्यातून ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत ४ लाख ५० हजार रुपये),  स्कोडा फोर-व्हीलर (किंमत २ लाख ५० हजार रुपये) आणि मोबाइल (किंमत २० हजार रुपये), असा एकूण ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे खामगाव शहर आणि शेगाव शहर पोलीस यांच्या अभिलेखावर दाखल असलेल्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची यशस्वी उकल झाली आहे. आरोपी संजयसिंग हा महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशनमध्ये २७ गंभीर गुन्ह्यांमध्ये “मोस्ट वॉन्टेड” होता, हे विशेष!

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!