अपघातग्रस्ताच्या मदतीला “स्वराज्य”च्या अध्यक्षांची धाव
नावात "करुणा", कार्यातही "करुणा"!

बीड,(प्रतिनिधी): “करुणा” या शब्दाचा अर्थ “दुसऱ्याचे दुःख पाहून अंतःकरण विरघळणे आणि त्याच्या मदतीसाठी धावून जाणे”, असा आहे. नावाचा हाच अर्थ बीडमध्ये प्रत्यक्ष कृतीतून स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी सिद्ध केल्याचा प्रत्यय नुकताच आला. महामार्गावर झालेल्या एका अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी व्यक्तीला त्यांनी मदतीचा हात देत, केवळ माणुसकीच जपली नाही, तर समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
बीड येथील महामार्गावर एका व्यक्तीचा भीषण अपघात झाला होता. तो रस्तावर विव्हळत पडलेला असताना रस्त्याने येणारे-जाणारे लोक केवळ बघ्याची भूमिका घेत होते. ही बाब करुणा मुंडे यांच्या निदर्शनास येताच या नारीने क्षणाचाही विलंब न लावता सदर व्यक्तीला उचलून स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नाही; अशाच प्रकारे आजवर ३ ते ४ वेळा त्यांनी अपघातग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत, हे विशेष! करुणा मुंडे यांच्या या कार्यामुळे “करुणा” या नावाचा खरा अर्थ अधोरेखित झाला. संकटात सापडलेल्या जीवाबद्दल वाटणारी कळकळ आणि ती दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजेच “करुणा”. राजकारणात सक्रिय असतानाही, सामान्य माणसाच्या जीवाचे मोल ओळखून त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेने “स्वराज्य शक्ती”चा खरा चेहरा दिसून आला.
अपघातग्रस्तांना मदत करा
या घटनेनंतर करुणा मुंडे यांनी अपघात झाला की लोक फक्त गर्दी करतात, फोटो काढतात, पण मदतीला कोणी येत नाही. ही आजची चौथी वेळ आहे की मला पुढाकार घ्यावा लागला. माझी बीडवासियांना हात जोडून विनंती आहे की, अपघातग्रस्तांना बघत बसू नका. त्यांना तातडीने रुग्णालयात न्या. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना आता सरकारकडून बक्षीस दिले जाते आणि पोलीस चौकशीचा त्रासही होत नाही. पोलीस केस होईल, ही भीती मनातून काढून टाका आणि माणुसकीला प्राधान्य द्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



