अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत दोन तरुण विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच समोर आली. या घटनांमुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या दोन्ही महिला आपापल्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या, हे विशेष!
पत्नी कागदपत्रांसह गायब
शेगाव ग्रामीण: शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जवळा महागाव येथील आरती राजेश सावदेकर (वय २५ वर्ष) ही विवाहित महिला १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बेपत्ता आहे. विशेष म्हणजे आरती निघून जाताना घरातील तिचे महत्त्वाचे शैक्षणिक कागदपत्रे आणि ओळखपत्रे सुद्धा सोबत घेऊन गेली.
जवळा महागाव (ता.शेगाव) येथील रहिवासी असलेले राजेश गोपाल सावदेकर (वय २८ वर्षे ) हे खाजगी ड्रायव्हिंगचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी आरती ही १६ फेब्रुवारीला घरातून निघून गेली. तिने सोबत स्वतःचे कपडे, शाळेची टी.सी., आधार कार्ड आणि पतीचे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा नेले. तिची उंची: ४.५ फूट, रंग निमगोरा, बांधा सडपातळ, उजव्या हाताच्या मनगटावर ‘R’ त्यानंतर ‘हृदयाचे चित्र’ आणि ‘A’ असे गोंदलेले असून तिने अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला आहे. या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार अरुण मेटांगे हे करत आहेत. उपरोक्त महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास शेगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सोनाटी येथील पदवीधर महिला बेपत्ता
मेहकर: मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सोनाटी नावाचे गाव आहे. या गावातील रहिवासी असलेली शितल विवेक खानझोडे (वय २३ वर्षे) ही तरुण महिला १७ फेब्रुवारीच्या रोजी रात्री १० ते १८ फेब्रुवारीच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास शितल ही घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. शितल ही उच्चशिक्षित असून तिचे कुटुंब मूळचे सोनाटी येथील आहे, परंतु सध्या ते कामाच्या निमित्ताने चाकण (जि.पुणे) येथील आंबेठाण परिसरात वास्तव्यास आहे.
याप्रकरणी विवेक नारायण खानझोडे (वय २९ वर्षे) यांनी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता मेहकर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. बेपत्ता शितलची उंची १६० सेमी, रंग गोरा, बांधा सडपातळ आहे. तिने अंगात मेहंदी रंगाची साडी, काळ्या रंगाचे ब्लाउज आणि वरून काळ्या रंगाचे जर्किंग घातलेले होते. उपरोक्त वर्णनाची तरुणी कुठे आढळल्यास केव्हा तिच्याबाबतीत काही माहिती मिळाल्यास मेहकर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार गजानन जायभाये हे करीत आहेत.