धाडच्या शिवजयंती मिरवणुकीत इसमावर जीवघेणा हल्ला

अभिनय बोर्डे

धाड, (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सवाच्या उत्साहात असतानाच धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीत उभे राहण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका १९ वर्षीय तरुणाने एका इसमावर स्टीलच्या कड्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी धाड पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

धाडनगरीतील वॉर्ड क्रमांक ६, बोराडे नगर येथील रहिवासी असलेले राजु शामराव शिंदे (वय ४१ वर्षे) हे १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवजयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी शिवाजी चौकातील हॉटेल संगम टी सेंटरसमोर उभे होते. सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मिरवणूक संभाजी महाराज चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत असताना यातील आरोपी शिव कृष्णा बोर्डे (वय १९ वर्षे) रा. धाड हा सदर ठिकाणी गेला आणि विनाकारण राजु शिंदे यांना “बाजूला हो” असे म्हटले. यावर शिंदे यांनी “येथे भरपूर जागा आहे, तू बाजूने निघून जा”, असे उत्तर दिले. याचा राग मनात धरून आरोपी शिव बोर्डे याने अचानक आपल्या हातातील स्टीलच्या कड्याने राजु शिंदे यांच्या डोक्यात दोन वेळा जोरात वार केले. या हल्ल्यात शिंदे हे गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर मिरवणुकीत एकच पळापळ सुरू झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार प्रताप भोस, गोपनीय पोलीस अंमलदार राजू माळी, पोलीस अंमलदार श्रीकृष चव्हाण यांच्यासह अन्य पोलीस अंमलदारांनी वेळीच मध्यस्थी करून आरोपीला ताब्यात घेतले.

याप्रकरणी राजु शिंदे यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शिव कृष्णा बोर्डे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास श्रीकृष्ण चव्हाण हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!