क्राईम जगत

क्राईम डायरी: चोऱ्या, मारहाण आणि फसवणुकीने जिल्हा हादरला

बुलढाणा जिल्ह्यातील ४८ तासांतील थरार!

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी) : गेल्या ४८ तासांत घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या घटनांनी बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. घरफोडी, लाखोंची फसवणूक, शेतातील मोटार चोरी आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या घटनांनी पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. धामणगाव बढे, रायपूर, अंढेरा आणि मेहकर परिसरात घडलेल्या या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.

भरदिवसा १.८५ लाखांची घरफोडी

धामणगाव बढे: धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माकोडी येथील रहिवासी असलेले जाबीरखान जुम्मा खान हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममधील प्लास्टिक ड्रममध्ये लपवून ठेवलेले १ लाख ६० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने, असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. जाबीरखान घरी परतल्यावर त्यांना घर उघडे दिसले. त्यांनी घरात जाऊन बघितले असता, आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी धामणगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल वरारकर हे करीत आहेत.

पोल्ट्री फार्ममध्ये १४ लाखांची फसवणूक

रायपूर: रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भडगाव शिवारात एका खाजगी कंपनीची तब्बल १४ लाख ४४ हजार ७५० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच समोर आली.

आरोपी गजानन मगर आणि त्यांच्या दोन मुलांनी कंपनीने सांभाळण्यासाठी दिलेली कोंबड्यांची पिल्ले मोठी झाल्यावर, कंपनीला कोणतीही कल्पना न देता परस्पर दुसऱ्या व्यापाऱ्यांना विकली. या प्रकरणी कंपनीचे ब्रांच मॅनेजर धीरज चौधरी यांनी जाफराबाद (जि.जालना) पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध झिरो प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हा आता रायपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीश कुमार पाटील हे करीत आहेत.

शेतातील मोटार चोरी

जानेफळ: जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत चोरट्यांनी आता आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळविला असून नायगाव दत्तपूर शिवारात अज्ञात चोरट्यांनी धरणावरील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी फोडून त्यातील तांब्याच्या तारा आणि केबल चोरून नेल्या. यामध्ये भूषण निकम यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे मिळून सुमारे ३९ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले. पिकांना पाणी देण्याच्या वेळीच हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी जाणेफळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात राडा

डोणगाव: पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विठ्ठलवाडी येथे एका बांधकाम कामगाराला ग्रामपंचायत कार्यालयातच मारहाण झाल्याची घटना नुकतीच समोर आली.

बांधकाम कामगार पंजाब गायकवाड हे ग्रामसेवकाची सही घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. त्यावेळी आरोपी धनराज राठोड याने “तू आमचा माणूस नाहीस”, असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने खिळे असलेल्या काठीने पंजाबराव गायकवाड यांना मारहाण केली. तसेच अंढेरा परिसरातही जुन्या वादातून परमेश्वर लोखंडे यांना काठी व दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी उपरोक्त आरोपींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत्यूचे गूढ आणि बेपत्ता तरुणांची चिंता

बुलढाणा शहरात चावडी कार्यालयासमोर स्वप्नील गोरखा (वय ३० वर्षे) या तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला, तर मेहकरमध्ये रस्ते अपघातात एका २३ वर्षीय तरुणाचा अंत झाला. अंढेरा येथील सागर जोहरी आणि शेगावला दर्शनासाठी गेलेला अकोल्याचा सत्यम काळे हे दोन तरुण बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबियांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात घडलेल्या या विविध घटनांमुळे पोलीस प्रशासनावर कामाचा ताण वाढला असून या घटनांनी जिल्हा हादरून सोडला आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!