स्मार्ट बुलढाणा
भीषण अपघात: चिखली-मेहकर रस्त्यावर अंत्यविधीला जाणाऱ्या तरुणावर काळाचा घाला
देवारीच्या २७ वर्षीय तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू

चिखली,(प्रतिनिधी) : चिखली-मेहकर महामार्ग म्हणजे अपघात प्रवण महामार्ग म्हणून ओळखल्या जातो. आज या राज्यमार्गावर पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला. अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या देवारी (ता.सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील एका तरुणावर २७ वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला. अंबाशी फाट्याजवळ झालेल्या या थरारक अपघातात या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

देवारी (ता.सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी असलेला राम सुरेश राठोड (वय २७ वर्षे) हा तरुण आपल्या एमएच-२०-एचएम-१३२९ क्रमांकाच्या दुचाकीने चिखली तालुक्यातील मांडावा येथे एका अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी जात होता. अंबाशी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएस-३७-जी-४८३७ क्रमांकाच्या भरधाव कारने रामच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, राम राठोड हा दुचाकीवरून हवेत फेकले गेला आणि त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. दुर्दैवाने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रामचा काही वेळातच घटनास्थळावरच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. तसेच चिखली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार अमोल गवई आणि सुनील राजपूत यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच रामचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.
गंतव्य स्थानी पोहोचण्यापूर्वीच मृत्यूची झडप
राम राठोड हे सावतबारा देवारी येथून मांडावा येथे आपल्या नातेवाईकाच्या निधनाचे वृत्त ऐकून तिकडे निघाले होते. मात्र, गंतव्य स्थानी पोहोचण्यापूर्वीच अंबाशी फाट्याजवळ मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली. एका अंत्यविधीसाठी निघालेल्या तरुणाचाच अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या गावावर आणि नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे.



