क्राईम जगत
सावधान! खामगावातून २३ वर्षांची उच्चशिक्षित तरुणी बेपत्ता
युवती बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): खामगाव शहरातील डी.पी.रोड परिसरातून अवघ्या २३ वर्षांची शिवानी धर्मेंद्र तिवारी नावाची तरुणी २२ फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून गूढरित्या बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच समोर आली. मैत्रीणीकडे जाते असे सांगून घराबाहेर पडलेली शिवानी रात्र उलटूनही घरी न परतल्याने तिवारी कुटुंब चिंतग्रस्त झाले असून तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरापूर्वी महिला व मुली बेपत्ता होण्याचे सुरू झालेले सत्र अद्यापही सुरूच असून यावर आता ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
खामगाव शहरातील डी.पी.रोड परिसरात राहणारी शिवानी तिवारी ही तरुणी २२ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास आपली स्कूटी घेऊन “मैत्रीणीकडे जाऊन येते”, असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, तासनतास उलटूनही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि संपूर्ण शहरात तिचा शोध घेतला, मात्र घटनेला २४ तास उलटूनही शिवानीचा शोध लागलेला नाही. ती ज्या स्कूटीने गेली ती कुठे आहे? तिचा मोबाईल लोकेशन काय सांगते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणी राजेश्वरी तिवारी यांनी खामगाव शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार विनोद शेळके हे करीत आहेत.माझी मुलगी सुरक्षित घरी परत यावी, एवढीच आमची मागणी असून पोलिसांनी तातडीने तिचा शोध घ्यावा, अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे.
शिवानीची उंची ५ फूट ६ इंच, सडपातळ बांधा, रंग गोरा असून तिने अंगात हिरवट-कथ्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि केशरी रंगाचा दुपट्टा घातलेला आहे. वरील वर्णनाच्या युवतीबद्दल काही माहिती मिळाल्यास खामगाव शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



