खळबळजनक: अचलपूरचा तरुण खामगावच्या लोखंडा येथून बेपत्ता!
घातपाताची शक्यता की कौटुंबिक कलह?

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): घरगुती वादाचे पडसाद उमटले आणि सुखी संसाराला अचानक ग्रहण लागले! अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील काकडा येथील विकास साहेबराव उईके (वय २८ वर्षे) हा तरुण बुलढाणा जिल्ह्यातील लोखंडा (ता. खामगाव) येथून गूढरीत्या बेपत्ता झाला आहे. २१ फेब्रुवारीच्या रात्रीपासून विकासचा कोणताही पत्ता नसल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
काकडा (ता.अचलपूर जि.अमरावती) येथील रहिवासी असलेला विकास उईके हा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या लोखंडा येथे आपल्या सासरवाडीला गेला होता. २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास विकासाचा घरगुती किरकोळ कारणांवरून पत्नीसोबत वाद झाला. या वादानंतर रागात असलेला विकास घरातून बाहेर निघून गेला. मात्र, तो अद्यापपर्यंत घरी परतलाच नाही. नातेवाईक सदाशिव मडावी यांनी फोनवरून ही माहिती विकासची आई रुखमाबाई उईके यांना दिली. आईने तात्काळ लोखंडा गाठून सून आणि विहीण-व्याह्यांकडे विकासाबाबत विचारपूस केली. मात्र, त्यांनी कोणीच समाधानकारक उत्तर दिले नाही. सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडे शोध घेऊनही विकासचा थांगपत्ता लागला नाही. तरुण मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने उईके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ६० वर्षीय आई रुखमाबाई यांनी आपल्या मुलाला शोधून देण्याची आर्त साद प्रशासनाला घातली आहे.
याप्रकरणी रुखमाबाई उईके यांनी हिवरखेड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. बेपत्ता विकासची उंची ५ फूट ६ इंच, रंग सावळा आहे. उपरोक्त वर्णनाच्या तरुणाबद्दल काही माहिती मिळाल्यास हिवरखेड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तापसी अंमलदार प्रवीण जाधव यांनी केले आहे.



