
नांदुरा,(प्रतिनिधी): कोलासर येथील टीन शेडचे कुलूप तोडून दोन लाख ७० हजार रुपयांच्या बोकड-बकऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २३ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता घडली.
कोलासर येथील रहिवासी असलेले संतोष श्रीराम देवकर यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. २३ फेब्रुवारी रोजी देवकर लहान-मोठ्या ६० बकऱ्या आणि बोकड टीनशेडमध्ये बांधून आणि टिन शेडला कुलूप लावून घरी गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी २४ फेब्रुवारी रोजी ५ वाजता बकऱ्यांना चारापाणी करण्यासाठी शेतातील टीन शेडवर गेले असता, त्यांना टिनशेडचे कुलूप तुटलेले दिसले. यावेळी बकऱ्या व बोकडांची मोजणी केली असता, त्यांना ६० पैकी फक्त ३४ बकऱ्या व बोकडे दिसून आले. ज्यामध्ये दहा बोकड (अंदाजे किंमत एक लाख दहा हजार रुपये व १६ बकऱ्या अंदाजे किंमत एक लाख साठ हजार रुपये), एकूण दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी संतोष देवकर यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द भारतीय न्याय संहिताचे कलम ३०५(अ), ३३४(१) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार नवाज शेख हे करीत आहेत.



