स्मार्ट बुलढाणा

बुलढाणा पोलीस भरती: २६ फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी

उमेदवारांसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर

बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील सन २०२४-२०२५ मधील पोलीस शिपाई (चालक) पदाच्या १४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. या पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, येत्या २६ फेब्रुवारी २०२६ पासून पोलीस मुख्यालय (बुलढाणा) येथील पोलीस कवायत मैदानावर शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या १४ जागांसाठी एकूण ६ हजार ११३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. २६ फेब्रुवारी २०२६ पासून चाचणीला सुरुवात होणार असून ७ मार्च २०२६ पर्यंत दररोज सकाळी ५ वाजेपासून ही चाचणी घेण्यात येणार आहे. होळी व धुलीवंदन सणामुळे १ मार्च ते ३ मार्च २०२६ या काळात चाचणी बंद राहणार आहे. पहिल्या दिवशी ७०० उमेदवार, तर उर्वरित दिवसांमध्ये दररोज १२०० उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार असून महिला उमेदवारांची मैदानी चाचणी स्वतंत्र दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी चाचणीसाठी जातांना मूळ कागदपत्रांसह त्यांच्या छायांकित प्रतींचे २ संच सोबत ठेवणे अनिवार्य आहे. सर्व प्रमाणपत्रे ०७/१२/२०२५ किंवा त्यापूर्वीची असणे आवश्यक आहे. मूळ आवेदन अर्ज, मूळ प्रवेश पत्र, ५ पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड / मतदान कार्ड / वाहन परवाना, / पॅन कार्ड, सर्व शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे, सोबत आणणे आवश्यक आहेत.
चाचणीसाठी परगावाहून येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने पुरुष उमेदवार यांच्यासाठी सबसिडीअरी कॅन्टीन (पोस्ट बुल्ढाणा ग्रामीण जवळ), तर महिला उमेदवार यांच्यासाठी स्व.दीपक जोग विश्रामगृह (स्टेट बँक चौकाजवळ) येथे त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. काही अडचण असल्यास कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक बी.डी. पावरा, बुलढाणा शहर ठाणेदार रवि राठोड, तसेच पोलीस नियंत्रण कक्ष (बुलढाणा) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यांच्याकडे करता येणार तक्रार
उंची किंवा छातीच्या मोजमापाबाबत तक्रार असल्यास तिथेच अपिलीय अधिकाऱ्यांकडे दाद मागता येणार आहे. येईल. दैनंदिन चाचणीचा निकाल रोज संध्याकाळी पोलीस मुख्यालयातील सूचना फलकावर आणि अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी आपल्या प्रवेशपत्रावर दिलेल्या तारखेनुसार आणि वेळेनुसार उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!