क्राईम जगत

पोटच्या मुलाची क्रूरता; कर्करोगग्रस्त वृद्ध आईसह वडिलांनाही मारहाण करून घराबाहेर काढले!

बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा दाखल 

बुलढाणा,(प्रतिनिधी) : राब राब राबून, एक वेळ उपाशी राहून पोटच्या गोळ्याला जपले. रक्ताचं पाणी करून लहानाचे मोठे केले. मात्र, त्याच आई-वडिलांना मुलाने आणि सुनेने उतारवयात नरकयातना देत त्यांना घराबाहेर हाकलले. प्रत्येकाच्या मनात संताप निर्माण करणारी ही घटना बुलढाणा शहरातील सावित्रीबाई फुले नगरमध्ये उघडकीस आली. या मद्यपी मुलाला आणि त्याच्या पत्नीला आपली वृद्ध आई कर्करोगाने ग्रस्त असल्याचीही दया आली नाही, हे विशेष! याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

बुलढाणा शहरातील सावित्रीबाई फुले नगर (वॉर्ड नं. १९) मध्ये काशिनाथ मराजी इंगळे हे ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्नीसह वास्तव्यास आहेत. काशिनाथ इंगळे हे पेन्शनधारक असून त्यातूनच त्यांच्या संसाराचा गाडा चालतो. मात्र, त्यांचा मुलगा बाळू काशिनाथ इंगळे याला दारूचे व्यसन जडलेले आहे. दारूच्या नशेत हा ‘कलयुगी’ मुलगा आपल्या जन्मदात्या पित्याला आणि आजारी आईला बेदम मारहाण करत असे. या क्रूरतेत त्याची पत्नी गीता बाळू इंगळे ही देखील मागे नव्हती. घरातील कामे न केल्यास वृद्ध सासू-सासऱ्यांना जेवण न देणे, त्यांना घरातून बाहेर काढण्याच्या धमक्या देणे, असे अमानुष प्रकार तिच्याकडून सुरू होता. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काशिनाथ इंगळे यांच्या पत्नी कर्करोगाने ग्रस्त आहे. अशा गंभीर आजारात त्यांना प्रेमाची आणि उपचारांची गरज असताना, मुलगा आणि सुनेने त्यांना घरकामासाठी सक्ती केली. काम न केल्यास त्यांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता वृद्ध पित्याची गाडी हिसकावून घेऊन त्यांना घराबाहेर हाकलून दिले आणि घरावर ताबा मिळवला. “पैसे द्या, अन्यथा जिवंत सोडणार नाही,” अशा धमक्याही या दाम्पत्याने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याप्रकरणी काशिनाथ इंगळे यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलगा बाळू इंगळे आणि सून गीता इंगळे यांच्याविरुद्ध ज्येष्ठ नागरिक व पालक यांचे पालनपोषण अधिनियम २००७ चे कलम २४, भारतीय न्याय संहिताचे कलम ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. स्वतःच्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अशा नराधम प्रवृत्तींना समाजात स्थान मिळता कामा नये. कायद्याने अशांना कठोर अद्दल घडवणे ही काळाची गरज असल्याच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रकाश बाजड हे करीत आहेत.

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!