क्राईम जगत
दुधा येथील ‘गजानन ज्वेलर्स’वर दरोडा
४ लाख ८० हजारांचे मौल्यवान दागिने लंपास; पेनटाकळीतही शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३३ हजारांचे साहित्य लंपास

अभिनय बोर्डे
धाड, (प्रतिनिधी): धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुधा येथील ‘गजानन ज्वेलर्स’ या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून धाडसी सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. अत्यंत धाडसी दरोड्याची ही घटना २५ फेब्रुवारी २०२६ च्या मध्यरात्री तीन ते चार वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बुलढाणा तालुक्यातील वरूड येथील रहिवासी असलेले वैभव अनंत खांडवीकर (वय २८ वर्षे) यांचे दुधा ( ता.बुलढाणा) येथे गजानन ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. २५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान, एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या ३ ते ४ अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाला लक्ष्य केले. अत्यंत नियोजनबद्धरीत्या दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी काही मिनिटांतच दुकानातील चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारून चांदीच्या ५७६ अंगठ्या: (वजन अंदाजे १६०० ग्रॅम) किंमत ३ लाख रुपये, चांदीच्या चैन पट्ट्या (३० नग) व जोडवे (५० नग) वजन अंदाजे ८०० ग्रॅम, किंमत १ लाख ८० हजार रुपये, असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मोठा ऐवज घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.
या प्रकरणी वैभव खांडवीकर यांनी धाड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१ (४), (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे हे करत आहेत.
पेनटाकळीतही शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि साहित्य लंपास
दरम्यान, व्यापारी प्रतिष्ठाने,घरे, वाहनेच नाहीतर आता शाळा, मंदिरेही चोरट्यांच्या निशाण्यावर आली असून, चोरट्यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पेनटाकळी येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात धाडसी चोरी केली. या चोरट्यांनी शाळेचे कुलूप तोडून मुख्याध्यापक कार्यालयातील सीसीटीव्ही संच, हार्ड डिस्क आणि इतर साहित्यासह एकूण ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी शिक्षक अतुल आसोले यांच्या फिर्यादीवरून साखरखेर्डा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (१) आणि ३०५ (A) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार कडुबा डोईफोडे हे करीत आहेत.



