क्राईम जगत
क्राईम डायरी: घरफोडी, हाणामारी आणि वादाच्या घटनांनी हादरला बुलढाणा जिल्हा
नांदुऱ्यात बॅग लिफ्टिंग,बुलढाणा, जळगाव जामोदमध्ये हल्ला, तर डोणगाव, किनगाव राजामध्ये घरफोडी

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या ४८ तासांत चोरी, मारहाण आणि धमकीचे गंभीर गुन्हे घडल्याचा प्रकार समोर आला. डोणगाव आणि किनगाव राजा येथे घरफोडीच्या घटना घडल्या असून, जळगाव जामोद व बुलढाणा शहरात मारहाणीचे गुन्हे दाखल झाले. गंभीर गुन्ह्याच्या वाढत्या घटना पोलिसांसाठी डोकेदुखी तर जिल्हावासियांसाठी दहशत निर्माण करणाऱ्या ठरत आहे. पोलिसांनी उपरोक्त सर्व प्रकरणांत कायदेशीर कारवाई करून तपास सुरू केला आहे.
नांदुरा: हॉटेलमधून सव्वा लाखाची बॅग लंपास
नांदुरा : येथील जुन्या बसस्थानकासमोरील दीपक रेस्टॉरंटमध्ये चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याची १ लाख ५ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली लेदर बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.
पलसोडा (ता.नांदुरा) येथील रहिवासी दिनेशसिंह हिंमतसिंह राजपूत (वय ६३ वर्षे) हे त्यांचे नातेवाईक चैनसिंग राजपूत यांच्यासह दीपक रेस्टॉरंटमध्ये चहा पिण्यासाठी बसले होते. त्यांच्याकडे असलेल्या लेदर बॅगमध्ये १ लाख ५ हजार रुपये रोख, नांदुरा अर्बन बँकेचे पासबुक व चेकबुक, निमगाव सेंट्रल बँकेचे पासबुक व चेकबुक आणि आधारकार्ड होते.
चहा पिऊन झाल्यावर बिल देण्यासाठी दिनेशसिंह उभे राहिले असता, त्यांना टेबलावर ठेवलेली बॅग दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला विचारपूस केली, मात्र काहीही पत्ता लागला नाही. भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी ही चोरी झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी दिनेशसिंह राजपूत यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तापस पोलीस अंमलदार मिलिंद जवंजाळ हे करत आहेत.
किरकोळ धक्क्यावरून डोके फोडले
बुलढाणा: बुलढाणा शहरात एका रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. ओमप्रकाश जाधव हे मिलिंदनगर येथे उसने पैसे देण्यासाठी गेले असता, आरोपी शुभम संजय जाधव याला त्यांचा धक्का लागला. ओमप्रकाश जाधव यांनी माफी मागूनही दारूच्या नशेत असलेल्या शुभमने सिमेंटची वीट डोक्यात मारून ओमप्रकाश यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी ओमप्रकाश जाधव यांनी बुलढाणा शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शुभम संजय जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५२, ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार प्रकाश बाजड हे करत आहेत.
मुलीची भेट अन् सव्वा लाखांच्या दागिन्यांची लूट
डोणगाव: पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लोणीगवळी येथे घरफोडीची घटना उघडकीस आली. लोणी गवळीचे रहिवासी असलेले रघुनाथ तुकाराम दोडके (वय ५५ वर्षे) हे आपल्या पत्नीसह कारंजा लाड येथे मुलीच्या भेटीसाठी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील कपाटात ठेवलेली ३० ग्रॅम सोन्याची पट्टी, ३ ग्रॅमचे झुमके, ८ ग्रॅमच्या दोन अंगठ्या आणि १० ग्रॅमची चांदीची पट्टी, असा एकूण १ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी डोमगाव पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार हे करीत आहेत.
कांदे भरण्याच्या वादातून व्यापाऱ्याला शिवीगाळ व धमकी
जळगाव जामोद: जामोद येथील गांधी पेट्रोल पंपासमोर ट्रकमध्ये कांदे भरत असताना रस्ता अडवल्याच्या कारणावरून वाद झाला. आरोपी सागर नामदेव भड याने व्यापारी शेख सलमान यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जळगाव जामोद पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार इरफान शेख हे करत आहेत.
साडूच्या लग्नाला गेलेल्यांचे घर साफ
किनगाव राजा: किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राहेरी बुद्रुक येथील रहिवासी असलेले अनिल अवसरमोल हे आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या घरात प्रवेश केला. तसेच घरातील सुटकेसमध्ये ठेवलेली २५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ मुंढे हे करीत आहेत.
२५ वर्षीय युवक घराबाहेरून गायब
जळगाव जामोद: येथील गोबजीखेल भागातील पवन सुभाष तायडे (वय २५ वर्षे) हा युवक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला आहे. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. त्याचा रंग सावळा, उंची ५ फूट ५ इंच, अंगात काळा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातलेली आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून उपरोक्त युवकाबद्दल माहिती मिळाल्यास जळगाव जामोद पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार संजय वेरूळकर यांनी केले आहे. जिल्ह्यात घडलेल्या या लहान मोठ्या घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे.



