शेगावात ‘मनी ट्रॅप’चा थरार!
पाच लाखांच्या लालसेपोटी मध्य प्रदेशातील तरुणाचे अपहरण;पोलिसांचे धाडसी 'सर्च ऑपरेशन' अन् थरारक सुटका!

शेगाव,(प्रतिनिधी): “तुम्ही १ लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला त्याचे ५ लाख करून देतो…” असे आमिष दाखवून परराज्यातील एका निष्पाप तरुणाला जाळ्यात ओढून शेगावात बोलावले जाते. त्यानंतर त्याला निर्जन शेतशिवारात नेऊन बेदम मारहाण करत बंदुकीच्या धाकावर लुटले जाते. मात्र, या कहाणीत थरारात ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा पीडित तरुण मृत्यूच्या दाढेतून शिताफीने निसटत पोलिसांना कॉल करतो आणि शेगाव पोलिसांनी मध्यरात्रीच्या अंधारात राबवलेल्या ‘सर्च ऑपरेशन’मुळे या मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश होतो.
मूळचा मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील असलेला २२ वर्षीय मजूर तरुण इंद्रकुमार मुन्नीलाल यादव याला फेसबुकवरील ओळख झालेला आरोपी विकास पाटील आणि त्याच्या साथीदारांनी १ लाख रुपयांच्या बदल्यात तुला ५ लाख रुपये देतो, असे सांगून मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून इंद्रकुमार शेगावात दाखल झाला. २७ फेब्रुवारीच्या रात्री, आरोपींनी इंद्रकुमारला गाठले आणि शेगाव-खामगाव रोडवरील चिंचोली (गाटगाव) शिवारात नेले. तिथे त्याला एका पडक्या खोलीत कोंडून ठेवण्यात आले. आरोपींनी त्याला “पैसे आणले का?” असे विचारत बेदम मारहाण सुरू केली. इंद्रकुमारकडे पैसे नसल्याचे पाहून आरोपींनी त्याच्याच मोबाईलवरून QR Code स्कॅन करायला लावून ४ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. इतक्यावरच न थांबता, “तुझ्या वडिलांना फोन कर आणि १ लाख रुपये मागवून घे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत त्याला ओलीस ठेवले.
रात्रभर आरोपींच्या ताब्यात असलेला इंद्रकुमार कमालीचा घाबरला होता. मात्र, संकटाच्या वेळी त्याने हार मानली नाही. पहाटेच्या सुमारास त्याने आरोपींकडे लघुशंकेसाठी जाण्याची परवानगी मागितली. आरोपींना त्याला सहज परवानगी दिली. याच संधीचा फायदा घेत इंद्रकुमारने एकांत गाठला आणि तातडीने ‘डायल ११२’ वर कॉल केला. “साहेब, माझे अपहरण झाले आहे, मला वाचवा!” असे म्हणत त्याने स्वतःच्या परिस्थितीची माहिती पोलिसांना दिली.
शेगाव पोलिसांचे ‘सर्च ऑपरेशन’
कॉल मिळताच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये खळबळ उडाली. पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. मोबाइल लोकेशन आणि फिर्यादीने सांगितलेल्या खुणांच्या आधारे पोलिसांनी पहाटेच्या अंधारात चिंचोली आणि गाटगाव शिवारात सर्च ऑपरेशन राबवले. जंगलासारख्या भागात आणि शेतशिवारात पोलिसांनी आरोपींची कोंडी केली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून आरोपींची पाचावर धारण बसली. पोलिसांनी धाडसी कारवाई करत घटनास्थळावरून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या, तर एक मुख्य सूत्रधार अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला. शेगाव ग्रामीण पोलिसांच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी पोलिसांची भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), ३०८(३), ३१८ (४), २०५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तापस पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे हे करीत आहेत.



