काळाचा घाला: अज्ञात वाहनाच्या धडकेने दीपकचा घटनास्थळीच मृत्यू
दीपक फुटबॉलसारखा ५० फूट लांब फेकला गेला!; रस्त्यावर पडला रक्ताचा सडा; धाडच्या गायत्री पेट्रोल पंपाजवळील घटना; धडक देऊन वाहन चालक फरार

धाड,(प्रतिनिधी) : एका अज्ञात वाहनाने दिलेल्या भीषण धडकेत दीपक गणेश गायकवाड (वय ३५ वर्षे) या तरुणाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज ११ वाजताच्या दरम्यान धाड येथील गायत्री पेट्रोल पंपांजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर दीपक फुटबॉलसारखा तब्बल ५० फुटांपेक्षा जास्त अंतर दूर फेकला गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्थानिक बोराडेनगरमधील रहिवासी असलेला दीपक गणेश गायकवाड हा सैलानी येथे मजुरीसाठी गेला होता. सैलानीवरून पायदळ घराकडे येण्यास निघाला. दरम्यान, ढालसावंगी येथून धाडकडे येत असताना धाड येथील गायत्री पेट्रोल पंपजावळ भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात वाहनाने दिपकला जोरदार धडक दिली. धडक इतकी वेगवान होती की, दीपकला सावरण्याची साधी संधीही मिळाली नाही. अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर दीपक फुटबॉलसारखा तब्बल ५० फुटांपेक्षा जास्त अंतर दूर फेकला गेला. त्याचा एका पायाचा अक्षरशः तुकडा पडला. तर डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर दिपकला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याची माणुसकी दाखवण्याऐवजी संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, रस्त्यावरील टायरच्या खुणा आणि मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे वाहन अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर असावे, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळतात धाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. गावातील नागरिकही अपघात स्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून नागरिकांच्या मदतीने दीपकचा मृतदेह शासकीय रुग्णवाहिकेतून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.
दीपकच्या अचानक जाण्याने गायकवाड कुटुंबाचा आधार हरपला आहे. या घटनेनंतर परिसरात अवैध रेती वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषी वाहन चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. याप्रकरणी धाड पोलिसांत अज्ञात वाहन चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



