अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी) : लैंगिकतेचा सैतान डोक्यात शिरल्यावर कोण काय करेल याचा नेमच उरला नाही. नव्हे तर पोलीस तपासात राहणाऱ्या त्रुटी, दोष सिद्ध होण्याचे तोकडे प्रमाण, यामुळे गुन्हेगारांच्या मनातील पोलीस आणि कायद्याची भीती पाहिजे त्याप्रमाणात उरलेली नाही, हे सत्य आहे. कायद्याचा धाक न उरलेल्या अशाच एका नराधमांची विकृती पराकोटीला पोहोचल्याचा प्रत्यय नुकताच गुळभेली (ता.मोताळा जि.बुलढाणा) येथे आला. एका २४ वर्षीय नराधमाने केवळ १२ वर्षांच्या निरागस बालिकेचे आयुष्य उद्ध्वस्त केले नाही, तर तिच्या असहायतेचा व्हिडीओ बनवून तो चक्क फेसबुकवर व्हायरल केला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, अशा नराधमाला भरचौकात फाशी द्यावी, अशी मागणी होत आहे.
गुळभेली (ता.मोताळा जि.बुलढाणा) येथील पीडित बालिका ही अवघ्या १२ वर्षे ६ महिने वयाची आहे. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही निरागस मुलगी आपल्या घरातील कामासाठी गावातील दुकानात जाण्यास निघाली. त्यावेळी तिच्यावर नजर ठेऊन असलेल्या आरोपी नितीन राजू चव्हाण (वय २४ वर्षे) रा. गुळभेली पीडिता निर्जन स्थळी पोहोचताच तिचा पाठलाग सुरू केला. नव्हेतर बळजबरीने तिचा हात धरून तिला ओढत गावातीलच राम बळीराम राठोड यांच्या घरात नेले. सदर ठिकाणी या नराधमाने पीडितेचे तोंड दाबून “जर ओरडलीस तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,” अशी जीवे मारण्याची धमकी देत या चिमुरडीवर पाशवी अत्याचार केला. पीडितेच्या वडिलांना ही बाब समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पीडितेच्या वडिलांनी धामणगाव बढे पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नितीन चव्हाण याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६४, ६४ (१), ७६, ७७, ७८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३) सह पोक्सो कायद्याचे कलम ४ व ६, आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६(ई), ६७(अ), ६७(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास बुलडाणा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गजानन कावळे हे करीत आहेत.
या घटनेमुळे गुळभेली परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. “अशा विकृतांना कायद्याचा धाक राहिला नाही का?” असा सवाल विचारला जात आहे. सोशल मीडियाचा वापर अशा गुन्ह्यांसाठी करणाऱ्यांना आणि अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना समाजात स्थान असता कामा नये, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत असून आरोपीला तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी आता जोर धरत आहे.
अत्याचाराचा व्हिडीओ केला व्हायरल!
आरोपी नितीन चव्हाण याची विकृती एवढ्यावरच थांबली नाही. तर त्याने चिमुरडीसोबत पाशवी कृत्य करतांना स्वतःच्या मोबाइलवर या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शूट केला आणि फोटो काढले. अत्याचार केल्यानंतर “जर तू कोणाला सांगितले तर हा व्हिडीओ सर्वांना दाखवेन.”, अशी धमकी दिली. नराधमाला तेवढ्यानेही समाधान लाभले नाही. त्याने पीडितेच्या चारित्र्याची आणि सन्मानाची पर्वा न करता, ते अश्लील व्हिडीओ आणि फोटो ‘फेसबुक’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले. काही वेळातच हे फोटो गावातील आणि परिसरातील लोकांच्या मोबाइलपर्यंत पोहोचले. एका १२ वर्षांच्या बालिकेची अशी बदनामी पाहून समाजमन सुन्न झाले आहे.