अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गायगाव खुर्द येथे एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. पवन रघुनाथ तायडे असे मृत तरुणाचे नाव असून, दारूच्या नशेत त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृत पवन तायडे हा रात्री दारू पिऊन आपल्या खोलीत झोपायला गेला होता. त्याने खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास वडील रघुनाथ तायडे हे मुलाला उठवण्यासाठी गेले असता, वारंवार हाक मारूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी अघटित घडल्याच्या शंकेने रघुनाथ तायडे आणि त्यांच्या पत्नीने घराचा दरवाजा तोडला. दरवाजा उघडताच पवनने खोलीच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला मच्छरदाणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. या घटनेनंतर रघुनाथ तायडे यांनी तातडीने मोहल्ल्यातील नागरिकांना बोलावून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला.
या प्रकरणी रघुनाथ तायडे यांनी शेगाव ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार मुबीन शहा हे करीत आहेत. अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाने अशा प्रकारे जीवन संपवल्यामुळे गायगाव खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.