अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): नांदुरा तालुक्यातील नारखेड येथील एक २४ वर्षीय तरुणी मैत्रीणीकडे जाते, असे सांगून घरातून निघून गेली. मात्र, ती घरी परतलीच नाही. याप्रप्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
नारखेड येथील रहिवासी असलेले सुनील सुखदेव खंडेराव (वय ५२ वर्षे) यांची मुलगी निकीता सुनील खंडेराव ही २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडली. “मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन येते,” असे सांगून ती घरातून निघाली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. नातेवाईकांनी गावातील तिच्या मैत्रिणींकडे आणि इतर नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला, परंतु निकीताचा कुठेही पत्ता लागला नाही.
या प्रकरणी निकिताच्या कुटुंबीयांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. निकीताची उंची साधारण ५.५ फूट, सडपातळ बांधा, गोल चेहरा, रंग गोरा असून तिने अंगात काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि गुलाबी रंगाचा फुलांची नक्षी असलेला टॉप घातलेला आहे. उपरोक्त वर्णनाच्या तरुणीबाबत माहिती मिळाल्यास नांदुरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार गजानन इंगळे हे करीत आहेत.