शेगावच्या ‘डाऊनटाऊन’ बारवर दारुड्यांचा राडा

अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): शेगाव शहरातील खामगाव रोडवर असलेल्या ‘डाऊनटाऊन’ बारमध्ये किरकोळ कारणावरून तिघांनी प्रचंड धुमाकूळ घातला. हॉटेलमधील सर्विसच्या कारणावरून वाद घालत आरोपींनी बारमधील काच, फ्रीजर आणि इतर सामानाची तोडफोड केली. एवढेच नव्हे तर, मध्यस्थी करणाऱ्या मालकाला आणि कर्मचाऱ्यांना फावड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील रहिवासी असलेले राकेश रमेशलाल काशेलानी (वय ५१ वर्षे) यांचे खामगाव रोडवर ‘डाऊनटाऊन’ नावाचे बार आहे. १ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास, काशेलानी यांनी आपले कामगार अफजल पटेल यांच्याकडे काउंटरची जबाबदारी सोपवली आणि ते बाहेर गेले. काही वेळाने त्यांना फोन आला की, हॉटेलमध्ये काही लोक सर्विसच्या कारणावरून वाद घालत असून तोडफोड करत आहेत. मालक काशेलानी तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना बारच्या आवारात तीन तरुण दारूच्या नशेत आरडाओरडा करताना दिसले. त्यांनी बारमधील काचा आणि फ्रीजरचे नुकसान केले होते. मालकाने व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तोडफोडीबाबत विचारणा केली असता, आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच लगतच पडलेला फावडा उचलून कामगार ईश्वर राजू चंदाने याच्या डाव्या पायावर जोरदार वार केला. वाद सोडवायला गेलेले मालक राकेश काशेलानी यांनाही त्यांनी चापटबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत त्यांच्या हाताला जखमा होऊन रक्तस्त्राव झाला, तर नशेत असलेले तिन्ही आरोपी स्वतः खाली पडल्याने त्यांनाही किरकोळ जखमा झाल्या. घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी राकेश काशेलानी यांनी शेगाव शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दीपक अशोक ढोले (रा. नांदुरा), निलेश महादेव मांजरे (रा. नांदुरा),  ओम ज्ञानेश्वर फाटे (रा. नांदुरा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३२४ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास निलेश गाडगे हे करीत आहेत. या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!