अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): फेब्रुवारी अखेर आणि मार्च महिन्याची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यासाठी गुन्हेगारीच्या दृष्टीने मोठी धावपळीची ठरली. शेगाव शहर, चिखली, खामगाव, मेहकर आणि नांदुरा या प्रमुख शहरांमध्ये चोरी, चेन स्नॅचिंग, गोवंश तस्करी आणि हिंसक हाणामारीच्या घटना घडल्या. पोलिसांनी या सर्व प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत.
चालत्या कारमधून गायीची चोरी
शेगाव: शेगाव शहरातील जुना चिंचोरी रोड, रोकडीया नगर भागात एक अत्यंत धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी शुभम कैलास माळी (वय २३ वर्षे) यांची १२ हजार रुपये किमतीची लाल रंगाची गाय दोन अज्ञात चोरट्यांनी चक्क एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये कोंबून लंपास केली.
२४ फेब्रुवारीच्या रात्री शुभम यांनी आपली जनावरे घरासमोर बांधली होती, मात्र कामाच्या गडबडीत एक गाय बांधायची राहून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाय दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही गाय न मिळाल्याने त्यांनी शेजारील राठोड यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये २५ फेब्रुवारीच्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती एका पांढऱ्या कारमधून आल्या आणि त्यांनी अतिशय शिताफीने गायीला कारमध्ये बसवून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
चोरीचा नवा पॅटर्न
खामगाव: खामगावच्या केला नगरमधील श्रीराम मंदिराजवळ चेन स्नॅचिंगची एक खळबळजनक घटना घडली. शांता रंगनाथ जायभाये (६० वर्षे) या आपल्या घरासमोर उभ्या असताना दोन अज्ञात तरुण दुचाकीवर आले. त्यांनी “शर्मा मॅडमचे ट्युशन कुठे आहे?” असे विचारून शांताबाईंचे लक्ष विचलित केले. क्षणाचाही विलंब न लावता, दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. शांताबाईंनी प्रतिकार केल्यामुळे आणि आरडाओरड केल्यामुळे दागिन्यांचे काही तुकडे खाली पडले, परंतु चोरटे १० ग्रॅमचे मंगळसूत्र आणि ५ ग्रॅमची मोहनमाळ (एकूण किंमत ७५ हजार रुपये) घेऊन पसार झाले. भरवस्तीत झालेल्या या लुटीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोवंश मांस विक्रीवर पोलिसांचे दोन मोठे छापे
चिखली: चिखली पोलिसांनी गोवंश हत्या आणि मांस विक्रीविरुद्ध मोठी मोहीम उघडत शहरातील बाबुलाज चौक परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली.
पोलीस अंमलदार विजय गीते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शफिक कुरेशी हा सार्वजनिक रस्त्यावर गोवंश मांस विकताना आढळला. त्याच्याकडून ४ किलो मांस आणि सुरा जप्त करण्यात आला. तर विशाल वायाळ यांच्या फिर्यादीवरून नजीर खान बुडण खान याला पत्र्याच्या शेडमध्ये मांस विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून मांसासह इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त करण्यात आला.
दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बारमधील वादातून रक्तबंभाळ मारहाण
शेगाव: शेगाव-खामगाव रोडवरील ‘डाउन टाउन बार’ मध्ये ग्राहकांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
दीपक अशोक ढोले (रा. नांदुरा) हे आपल्या मित्रांसह जेवणासाठी गेले होते. हॉटेल मॅनेजरने सर्विस नीट न दिल्याने त्यांनी जाब विचारला.
या साध्या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. बार मॅनेजर, शिवा नावाचा इसम आणि इतर ५-६ कर्मचाऱ्यांनी मिळून दीपक ढोले आणि त्यांच्या मित्रांना काचेच्या बाटल्यांनी आणि सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. यामध्ये फिर्यादीचे डोके फुटून ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १८९(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जमिनीच्या वादातून दोन कुटुंब भिडले
शेगाव: शेगाव शहरातील महात्मा फुले शाळेच्या मागे राहणाऱ्या दोन नातेवाईकांमध्ये घराच्या जागेवरून हिंसक संघर्ष झाला:
आदिल खान यांनी तक्रार दिली की, त्यांचे काका मुस्ताक खान यांनी बांधकामाच्या कारणावरून त्यांना फावड्याच्या प्लास्टिक दांड्याने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तर मुस्ताक खान यांनी प्रति-तक्रार दिली की, आदिल खान आणि त्यांच्या मुलांनी मुस्ताक खान यांचे संडासचे बांधकाम तोडले आणि त्यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.
बेकायदेशीर पुतळा बसवल्याने तणाव
मेहकर: मेहकर तालुक्यातील रत्नापूर येथे ग्रामपंचायतीच्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा बसवला. ग्रामविकास अधिकारी शरद वानखेडे यांनी या प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. प्रशासनाची परवानगी न घेता सार्वजनिक जागेवर पुतळा बसवणे हा नियमांचा भंग असल्याने पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
गोवंश वाहतुकीवरून वाद
देऊळगाव राजा: देऊळगाव राजा बस स्थानक परिसरात ८ गोवंश (गायी व बैल) घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना गौरव देशमाने यांनी हटकले. “हे गोवंश कुठे नेले जात आहेत?” असे विचारले असता, आरोपी नंदाजी नागरे आणि त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीला लोटपाट करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुण बेपत्ता; आईची आर्त हाक
नांदुरा: नारखेड (ता. नांदुरा) येथील आकाश संजय खंडेराव हा २६ वर्षीय तरुण २८ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. आकाश जेसीबीवर कामाला जातो असे सांगून घरातून निघाला होता. सर्व नातेवाईकांकडे शोध घेऊनही तो न मिळाल्याने आई राजकन्या खंडेराव यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. आकाशची उंची १७० सेमी, निमगोरा रंग असून त्याने पांढरा शर्ट आणि निळी जिन्स घातलेली आहे. त्याच्या संदर्भात काही माहिती मिळाल्यास नांदुरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास
तामगाव:तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पातुर्डा बुद्रुक येथील अविनाश झाडोकार हे घराला कुलूप लावून पुणे येथे गेले असता, चोरट्यांनी संधी साधली. त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० हजार रुपये रोख आणि ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (१२ ग्रॅम), चोरून पोबारा केला. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित दुचाकीवरून जाताना दिसत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
‘पॉक्सो’ अंतर्गत दुकानदाराला अटक
खामगाव: खामगाव शहरात एका संतापजनक घटनेत, चिप्स घेण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी ४०-४५ वर्षीय दुकानदार निलेश मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने धाडस दाखवून घरच्यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
महावितरण कर्मचाऱ्याचा ५.३९ लाखांचा डल्ला
अमडापूर: शासकीय रकमेचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार अमडापूर येथे उघडकीस आला आहे. ईसोली कार्यक्षेत्राचे महावितरण कर्मचारी राम बद्रीनाथ बराटे यांनी ग्राहकांकडून वीज बिलापोटी जमा केलेले ५ लाख ३९ हजार १२० रुपये सरकारी तिजोरीत जमा न करता स्वतःसाठी वापरले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.