खामगाव,(प्रतिनिधी): भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीने पुन्हा एकदा दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला. खामगाव-लोखंडा नॅशनल हायवेवर काल झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
प्राप्त माहितीनुसार, विनोद शामलाल सुसगोधर (वय ५५ वर्षे) आणि त्यांचे मित्र उमेश जगन पवार (वय ४५ वर्षे) हे ५ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास आपल्या बजाज प्लॅटीना क्रमांक एमएच-२८-बीएच-६१९८ वरून लोखंडा शिवारातील एका ढाब्यावर कामासाठी जात होते. यावेळी लोखंडकार ढाब्याजवळ समोरून येणाऱ्या होंडा शाईन क्रमांक एमएच-२८-बीझेड-३२९९ च्या चालकाने त्यांना जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की विनोद सुसगोधर यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली, तर उमेश पवार हे देखील रक्तबंबाळ झाले. त्यांना तातडीने खामगाव आणि त्यानंतर अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, विनोद सुसगोधर यांचा ५ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर उमेश पवार यांना पुढील उपचारासाठी शिर्डी येथे नेण्यात आले होते, मात्र आज ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांचीही प्राणज्योत मालवली.
हा अपघात रतन भानु कोळपे नावाच्या चालकाने आपली दुचाकी भरधाव वेगाने आणि हयगयीने चालवल्यामुळे घडल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. तक्रारदार अविनाश कैलास सुसगोधर यांनी हिवरखेड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.