नांदुरा: बर्निंग बसचा थरार! इंदूर-अकोला ट्रॅव्हल्सला महामार्गावर भीषण आग

नांदुरा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नजीक राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एका खासगी ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागली. आगीने रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे बसमधील ३० प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ याचा प्रत्यय आज नांदुरावासीयांना आणि बसमधील प्रवाशांना आला.

मध्य प्रदेशातील इंदूर येथून ही खाजगी बस विदर्भातील अकोल्याच्या दिशेने निघाली होती. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून ही बस ७ मार्च रोजी दुपारी बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वरून भरधाव वेगात जात असताना, नांदुरा शहराजवळ अचानक बसमधून धूर निघू लागला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच ठिणगीचे रूपांतर भीषण आगीत झाले.

अनेकदा खासगी ट्रॅव्हल्सचे चालक टीकेचे धनी ठरतात, परंतु आजच्या घटनेत चालकाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली. बसला आग लागल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच, त्याने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बस थांबताच वाहकाच्या मदतीने सर्व ३० प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्याचे आवाहन केले. आगीने बसला पूर्णपणे कवेत घेण्यापूर्वीच सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले होते. जर चालकाने काही सेकंदांचाही उशीर केला असता, तर मोठा अनर्थ घडला असता.

साहित्याची राखरांगोळी, पण जीव वाचला!

आग एवढी भीषण होती की प्रवाशांना स्वतःचे साहित्य बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. प्रवाशांच्या बॅगा, कपडे आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज आगीत जळून खाक झाले आहेत. मात्र, आगीच्या विळख्यातून सहीसलामत बाहेर पडल्यानंतर प्रवाशांच्या चेहऱ्यावर मृत्यूला जवळून पाहिल्याची भीती स्पष्टपणे दिसत होती. अनेकांना तर काय बोलावे हे सुचत नव्हते, केवळ डोळ्यांतून अश्रू वाहत होते.

अग्निशमन दलाची तत्परता आणि स्थानिकांची मदत

घटनेच माहिती मिळताच नांदुरा नगर परिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच स्थानिक पोलीस आणि नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना धीर दिला. या भीषण आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आग विझवल्यानंतर महामार्गावरील राडारोडा बाजूला करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले.

शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज

ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे अधिकृतघटनेची कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार बसमधील इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये ‘शॉर्ट सर्किट’ झाल्यामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून बसची तांत्रिक तपासणीही केली जाणार आहे. आजच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, वाहनांच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!