“एलसीबी”च्या एकाच रात्री १० ठिकाणी धाडी

बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांची आता खैर नाही! पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी जिल्ह्याची धुरा हाती घेतल्यापासून गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले असून, त्याचे जिवंत उदाहरण गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धडक कारवायांमधून समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्याला विळखा घालू पाहणाऱ्या जुगार आणि दारू माफियांवर सर्जिकल स्ट्राईक करत त्यांचे कंबरडे मोडून काढले आहे. नव्हे तर पोलीस अधीक्षक तांबे यांचा आदेशामुळे गुन्हेगारांची ‘पाचावर धारण’ बसली आहे.

जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि श्रेणीक लोढा यांच्या अचूक मार्गदर्शनाची जोड मिळाली. पोलीस अधीक्षकांच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आणि जिल्ह्यातील गुन्हेगारांची झोप उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी आपल्या धाडसी नियोजनाने १० वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र पथके तैनात केली. तामगावपासून ते लोणारपर्यंत आणि चिखलीपासून ते शेगावापर्यंत कुठेही गुन्हेगारांना पळायला वाव शिल्लक ठेवला नाही. या धडक कारवाईत एकूण १७ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून २५,६२५ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

कुठे-कुठे पडल्या धाडी? 

स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने खालील १० ठिकाणी छापे टाकले. यामध्ये तामगाव (एकलारा बानोद) येथे पत्त्यांच्या जुगारावर धाड टाकून ५ जणांसह आरोपी सागर गिरी याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ हजार ९८० रोख जप्त करण्यात आली. पिंपळगाव राजा (काळेगाव) येथे कारवाई करून भगवानसिंग सोळंके व इतर २ आरोपींना जुगार खेळताना रंगेहात पकडले. अंढेरा (अंत्री खेडेकर) येथे प्रभाकर मोरे याला वरली मटका चालवताना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चिखली (महादेव मंदिर परिसर) येथे प्रकाश कराडे याच्या अड्ड्यावर धाड टाकून जुगाराचे साहित्य जप्त केले. देऊळगाव राजा (देऊळगाव मही) येथे शेख कदीर शेख कादर याच्यावर कारवाई करण्यात आली. मेहकर येथील बसस्थानक परिसरात भरवस्तीत सुरू असलेल्या वरली अड्ड्यावर छापा टाकून शेख खलीलला जेरबंद केले. धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रोहिणखेड) येथे शिवाजी इंगळे या जुगारीला पोलिसांनी धूळ चारली. शिवाजीनगर (खामगाव) येथे आकाश वानखडे या २२ वर्षीय तरुणाला ५ हजार ११५ रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. लोणार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येवती येथे राजेंद्र डोईफोडे याच्याकडे असलेली अवैध देशी दारू जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तर किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या निमगाव बुद्रुक येथे समाधान वाघुळ याला अवैध दारू विक्री प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.

‘सुधरा, अन्यथा जेलची हवा खा!’

या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. तांबे यांच्या नेतृत्वाखालील बुलढाणा पोलीस हे केवळ नावाला पोलीस नसून ते सामान्यांचे रक्षक आणि गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरत आहेत. सुनील अंबुलकर यांच्या पथकाने ज्या पद्धतीने एकाच वेळी १० ठिकाणी झडती घेतली, त्यावरून पोलिसांचा गुप्तचर विभाग किती सतर्क झाला आहे, यातून दिसून येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!