बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली असून, पथकाने गुरुवारी १२ मार्च २०२६ रोजी मोठी कारवाई केली. अवैध दारू वाहतुकीवर छापा टाकत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून विदेशी दारू आणि एक मारुती सुझुकी इको कार, असा एकूण १ लाख ५९ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
अमडापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने सापळा रचून संशयास्पद रित्या येणाऱ्या मारुती सुझुकी इको कारला अडवले. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा मिळून आला. पोलिसांनी या कारवाईत विदेशी दारू (अंदाजे ९,६६० रुपये), मारुती सुझुकी इको कार (किंमत १,५०,००० रुपये), असा एकूण १ लाख ५९ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ)(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार अनंता फरतळे, सुनील मिसाळ, गणेश वाघ आणि महिला पोलीस अंमलदार दिपाली चव्हाण यांच्या पथकाने केली.