नोकरीचे आमिष दाखवून भाजपा पदाधिकाऱ्याकडून ३.८२ लाखांची फसवणूक

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका सुशिक्षित बेरोजगाराची ३ लाख ८२ हजार ६८० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मलकापूरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी भाजपा पदाधिकारी अरविंद मनोहर किनगे (रा.चाळीसबिघा, मलकापूर) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीडित युवक गणेश विष्णू वैतकर (रा. कुंड बु., ता. मलकापूर) यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे एका लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे वैतकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अरविंद किनगे यांनी गणेश वैतकर यांना बाजार समितीत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून ४ लाख रुपयांची मागणी केली होती. नोकरीच्या आशेने गणेश यांनी ६ जानेवारी २०२६ रोजी ५०-५० हजार रुपयांचे दोन हप्ते (फोन पे द्वारे), ७ जानेवारी २०२६ रोजी ३२ हजार ६८० रुपये, ८ जानेवारी २०२६ रोजी १ लाख रुपये, ९ जानेवारी २०२६ रोजी ऑनलाइन स्वरूपात दिल्या. तसेच प्राप्तिकर विभागाची भीती दाखवल्याने किनगे यांच्या पत्नीच्या खात्यावर २ लाख रुपये, अशा प्रकारे एकूण ३ लाख ८२ हजार ६८० रुपये उकळण्यात आले. पैसे घेताना किनगे यांनी आमदार चैनसुख संचेती आणि बाजार समितीचे सभापती संजय काजळे यांच्या नावाचा वापर करून, “त्यांना हिस्सा दिल्याशिवाय काम होणार नाही,” असे खोटे सांगून विश्वास संपादन केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे गणेश वैतकर यांनी ही रक्कम स्वतःची बचत, घरातील दागदागिने मोडून आणि नातेवाईकांकडून उसने घेऊन जमवली होती. मात्र, पैसे घेऊनही नोकरी मिळत नसल्याने जेव्हा त्यांनी विचारणा केली, तेव्हा किनगे यांनी “तू मला फोन करू नकोस, मी कामात आहे. जर पुन्हा पैसे मागितले तर पोलीस आणि नेत्यांच्या ओळखीने तुला खोट्या केसमध्ये अडकवेन. पत्नीच्या माध्यमातून महिला आयोगाकडे तक्रार करीन किंवा गुंडांकडून तुझा काटा काढीन,” अशा गंभीर धमक्या देखील किनगे यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

कुटुंबाचा आत्महत्येचा इशारा

फसवणूक आणि सततच्या धमक्यांमुळे वैतकर कुटुंब प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. “एकतर नोकरी मिळाली नाही आणि कष्टाचे पैसेही गेले, आता आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही,” अशी हतबलता गणेश वैतकर यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी दोषी अरविंद किनगे यांच्यावर कडक कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!