अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): शहरातील गजबजलेल्या बिर्ला रोडवरील हकीमी हॉस्पिटल परिसरातून एक बजाज प्लॅटीना दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरणखेड (ता. मलकापूर) येथील रहिवासी आणि कृषी केंद्र चालक अरविंद अशोक खाचणे (वय ३७ वर्षे) यांनी मार्च २०१९ मध्ये आपल्या दैनंदिन वापरासाठी एक काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना क्रमांक एमएच-२८-बीएफ-१८२० खरेदी केली होती. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास खाचणे हे घरगुती सामान खरेदी करण्यासाठी मलकापूर शहरातील बिर्ला रोडवरील हकीमी हॉस्पिटल जवळ आले होते. त्यांनी आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणी उभी केली आणि ते बाजारात सामान घेण्यासाठी गेले. मात्र, काही वेळाने काम आटोपून परत आले असता, त्यांना आपली दुचाकी लावलेल्या जागी दिसून आली नाही.
शोध घेऊनही दुचाकी मिळाली नाही. गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच खाचणे यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. ओळखीच्या व्यक्तींकडे विचारपूस केली, मात्र दुचाकीचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर पाच दिवस स्वतःच्या स्तरावर शोध घेतल्यानंतर, दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशन गाठले आणि रीतसर तक्रार दाखल केली.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार रवींद्र दळवी हे करीत आहेत. शहरात वर्दळीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरीस गेल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.