उधारीचे पैसे मागितल्याने सजनपुरीत राडा

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणावर लाकडी फावड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सजनपुरी भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गंभीर जखमी असलेल्या फिर्यादीवर उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सजनपुरी येथील रहिवासी सुरेश भैयालाल मदारीवाले (वय ३७ वर्षे) यांचे दशमेश हॉटेलच्या बाजूला चहा-नाश्त्याचे छोटे हॉटेल आहे. आरोपी शाम नारायण भगतपुरे (रा. बलवारपुरा, सजनपुरी) हा नेहमी या हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी येत असे. गेल्या काही दिवसांपासून आरोपीकडे फिर्यादीचे एकूण ४ हजार रुपये उधारीचे झाले होते. ९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास आरोपी शाम भगतपुरे हा नेहमीप्रमाणे हॉटेलसमोर आला असता, सुरेश मदारीवाले यांनी त्याला थांबवून आपल्या उधारीच्या पैशांची मागणी केली. कष्टाचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली. उधारी मागताच आरोपीने फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, “तुझे पैसे देत नाही, तुझ्याच्याने जे होईल ते करून घे,” अशी थेट धमकी दिली. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने जवळच असलेल्या मोटारसायकलला बांधलेले लाकडी फावडे काढले आणि काही समजण्याच्या आत सुरेश मदारीवाले यांच्या डोक्यात जोराने प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले.

घटनेनंतर जखमी सुरेश यांना तातडीने खामगाव येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. जखम गंभीर असल्याने त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. दरम्यान, १३ मार्च रोजी डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर, त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. त्यांच्या तक्रारीवरून खामगाव पोलिसांनी आरोपी शाम नारायण भगतपुरे विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८ (२), कलम ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुरज राठोड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!