दारूच्या नशेत घरात घुसन तरुणाचा राडा; जीवे मारण्याची दिली धमकी

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील दसरखेड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरात घुसून धिंगाणा घालणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. चोरीच्या उद्देशाने किंवा जीवे मारण्याच्या इराद्याने घरात शिरलेल्या या संशयिताने घरमालकाला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दसरखेड येथील रहिवासी असलेले संतोष निवृत्ती साठे (वय ३७ वर्षे) हे १५ मार्चच्या मध्यरात्री आपल्या घरात झोपलेले होते. साधारणतः रात्री १२.३० वाजेच्या सुमारास आरोपी नयन बंडू दवंगे (वय १८ वर्षे) रा. दसरखेड याने घराच्या छतावर चढून जिन्यावाटे त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात कोणाची तरी चाहूल लागताच संतोष साठे यांना जाग आली. समोर गावातीलच नयन हा उभा असलेला दिसला. साठे यांनी नयनला हटकले असता, तो दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. “तू मध्यरात्री घरात कसा काय आलास? तुझ्या हातात काय आहे? तू चोरी करायला आला आहेस का?” असे विचारताच नयनचा पारा चढला. त्याने साठे यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि “तुला जीवे मारून टाकील” अशी धमकी दिली.

घरातील आरडाओरड ऐकून संतोष साठे यांचा भाऊ विजय साठे, संदेश शिंदे, दीपक मस्कादे, संतोष बाळापुरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. जमलेल्या सर्वांनी मिळून नयन दवंगे याला पकडून ठेवले. त्याला विचारपूस केली असता, तो काहीही बोलत नव्हता. अखेर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपाला ताब्यात घेतले.

याप्रकरणी संतोष साठे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी नयन दवंगे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३३३, २९६, ३५१(२)(३) सह महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८५(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार विजय टेकाडे हे करीत आहेत. या घटनेमुळे रात्रीच्या गस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संशयित व्यक्ती घरात घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!