सावधान! बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवसात पुन्हा चार तरुणी बेपत्ता

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात सध्या चिंतेचे ढग गडद झाले असून, अवघ्या २४ तासांत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत चार तरुण मुली आणि महिला बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. बोराखेडी, धामणगाव बढे, नांदुरा आणि जळगाव जामोद या परिसरातून या मुली बेपत्ता झाल्या असून, यामुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि समाजाने आता डोळे उघडण्याची वेळ आली आहे का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

बोराखेडी: संडासला जाते म्हणून गेलेली विवाहिता परतलीच नाही…बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत वाघजाळ (ता. मोताळा) येथील २० वर्षीय विवाहिता निता छगन वाघमारे ही २० मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातून ‘संडासला जाते’ असे सांगून निघाली, ती अद्याप घरी परतली नाही. तिचे पती आणि नातेवाईक पळशी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले असताना ही घटना घडली. लाल साडी परिधान केलेली ही तरुण महिला नेमकी कुठे गेली? घातपात की अन्य काही? याचा तपास पोलीस अंमलदार बळीराम खंडागळे करत आहेत.

धामणगाव बढे: रात्रीच्या सुमारास १८ वर्षीय तरुणी गायब…धामणगाव बढे येथे तर धक्कादायक प्रकार घडला आहे. १८ मार्चच्या रात्री सर्व कुटुंबीय झोपलेले असताना, १८ वर्षीय आसीबा दिलावर तडवी ही कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. २० मार्च रोजी याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, गुलाबी पंजाबी ड्रेसमधील ही तरुणी दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने तडवी कुटुंब हादरून गेले आहे.

नांदुरा: किराणा आणायला गेलेली ‘कांचन’ बेपत्ता…नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील १८ वर्षीय कांचन सुनील चरखे ही २० मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता ‘किराणा दुकानातून सामान आणते’ असे सांगून घरून निघाली. मात्र, तासनतास उलटूनही ती परतली नाही. पांढऱ्या-गुलाबी रंगाचा शॉर्ट आणि प्लाझो घातलेली कांचन कुठे गायब झाली, याचे गूढ कायम आहे. कपाळावर पांढरा डाग असलेल्या या तरुणीचा शोध आता पोलीस अंमलदार गजानन इंगळे घेत आहेत.

जळगाव जामोद: काकाच्या घरी जाते म्हणाली आणि…जळगाव जामोद तालुक्यातील रसुलपूर येथील २४ वर्षीय राफिया कलींदर तडवी ही १६ मार्चपासून बेपत्ता आहे. आपल्या आजीला ‘काकाच्या घरी जाऊन येते’ असे सांगून निघालेली राफिया अद्याप घरी पोहोचलेली नाही. २० मार्च रोजी तिच्या वडिलांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली राफिया चार दिवसांपासून बेपत्ता असूनही तिचा पत्ता न लागल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

एकाच दिवशी आणि एकामागोमाग एक अशा प्रकारे तरुण मुली बेपत्ता होणे, ही केवळ योगायोग असू शकत नाही. अनेक प्रकरणांत सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी ओळख किंवा आमिष दाखवून पळवून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन आपल्या पाल्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची हीच ती वेळ आहे. कोणाला या मुलींबाबत काहीही माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!