अजय टप
जळगाव जामोद, (प्रतिनिधी): शाळेत जाणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वाईट हेतूने पाठलाग करून तिचा मोबाईल नंबर मागणाऱ्या एका रोडरोमिओला जळगाव जामोद पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव जामोद येथील अयोध्या नगरमध्ये राहणारे प्रल्हाद गोविंद कोथळकर (वय ४१ वर्षे) यांची १३ वर्ष ७ महिने वयाची मुलगी २० मार्च २०२६ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जात होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारास, ती मुलगी दुर्गा माता चौक येथून ‘दि न्यू ईरा स्कूल’ कडे पायी जात असताना, आरोपी शकील खान इम्तियाज खान (रा. काझीपुरा, जळगाव जामोद) याने तिचा पाठलाग सुरू केला.
आरोपीने शाळेच्या गेटपर्यंत तिचा पिच्छा पुरवला आणि तिला अडवून तिचा मोबाईल नंबर मागितला. या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली. तिने घरी गेल्यावर आपल्या पालकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, तिच्या वडिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.
जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी शकील खान विरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ७४, ७८, ७९ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत.