बुलढाणा, (प्रतिनिधी): स्थानिक गुन्हे शाखेने अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकून एका शेतातून बेकायदेशीररीत्या लावलेली तब्बल ९ लाख १८ हजार ३२० रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या “मिशन परिवर्तन” मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मेरा शिवारात कृष्णा हरीराम वाघमारे याने स्वतःच्या शेतात (गट नं. २०३) वांग्याच्या पिकाच्या आड अफूची लागवड केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ मार्च २०२६ रोजी या ठिकाणी छापा टाकला असता, तिथे अफूची झाडे आणि बोंडे आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी ११ किलो ४७९ ग्रॅम वजनाचा ओला अफूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी कृष्णा हरीराम वाघमारे (वय २६ वर्ष, रा. मेरा खुर्द, ता. चिखली) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस अंमलदार राजकुमार राजपूत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
या प्रकरणी उपरोक्त आरोपीवर अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये अंमली औषधीद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम कलम ८ (क) आणि १८ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.