खळबळजनक: खामगावमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

अजय टप

खामगाव,(प्रतिनिधी): एकीकडे महिला सुरक्षेचे दावे केले जात असतानाच, खामगाव तालुक्यातील जुनेगाव घाटपुरी येथे एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय नराधमाने १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून, तिला प्रेमसंबंधासाठी धमकावत मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून पीडितेने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पुण्येश गणेश रत्नपारखी (वय २० वर्षे) रा. वाडी, खामगाव हा गेल्या अनेक दिवसांपासून पीडित ऋतुजा (नाव बदलले आहे) हिचा ती क्लासला जात असताना पाठलाग करत होता. “तू माझ्याशी बोल, माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहा,” असा तगादा लावून तो तिचा विनयभंग करत होता. इतकेच नाही तर, त्याने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आणि मेसेज करून पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.

आरोपीचे धाडस इतके वाढले होते की, पीडितेने नकार दिला असता त्याने “जर तू माझ्याशी बोलली नाहीस, तर मी माझ्या जीवाचे बरे-वाईट करून घेईन,” अशी धमकी देऊन तिला मानसिक दबावाखाली ठेवले होते. आरोपीच्या या सततच्या त्रासामुळे आणि छळामुळे पीडित मुलगी अत्यंत तणावाखाली होती. शेवटी, हा छळ असह्य झाल्याने पीडितेने २६ मार्च रोजी राहत्या घरातील बाथरुममध्ये असलेले ‘हार्पिक’ हे विषारी औषध प्राशन केले.

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन (खामगाव) येथे आरोपी पुण्येश रत्नपारखी विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७८, ७९, ३५१(२) आणि सह कलम १२ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित तळोले हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!