पुष्पक मानकर
अकोला,(प्रतिनिधी): रिधोरा शिवारातील दुर्गम जंगल भागात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्रांनीच मित्राचा काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी दोन आरोपींना वेगवेगळ्या जिल्ह्यांतून शिताफीने ताब्यात घेतले आहे.
दिनांक २६ मार्च २०२६ रोजी दुपारच्या सुमारास बाळापूर तालुक्यातील रिधोरा शेतशिवारातील एका निर्जन आणि दुर्गम भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि बाळापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. उन्हाच्या तीव्रतेमुळे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बळावला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाचे चक्र फिरवण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी तपासणीसाठी दोन विशेष पथके तयार केली. मृतदेहावरील कपडे आणि इतर वस्तूंच्या आधारे आजूबाजूच्या गावांत चौकशी करण्यात आली. ताकोडा (अमानतपूर) येथील नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृत युवक हा सचिन वाल्मीक खंडारे (वय २९ वर्षे) रा. अमानतपूर ताकोडा (ता. बाळापूर) असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मित्रमंडळींची आणि कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सचिन हा त्याच्या दोन मित्रांसोबत मोटारसायकलवर जाताना दिसला. संशयाच्या सुईवरून पोलिसांनी तपास केला असता, घटनेनंतर त्याचे दोन्ही मित्र गायब असल्याचे आढळले.
पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेत आरोपींचा माग काढला. दरम्यान, आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी सापळा रचून
आरोपी अभिषेक प्रकाश गवळी (वय २४ वर्षे) याला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथून ताब्यात घेण्यात आले. तर दुसरा आरोपी आदेश सुधीर डोंगरे (वय २४ वर्षे) याला जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून बेड्या ठोकण्यात आल्या.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सपोनि विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ जाधव, विष्णू बोडखे, माजीद पठाण, तसेच अंमलदार शेख हसन, अब्दुल माजीद, वसिमोद्दीन, किशोर सोनोने, रवींद्र खंडारे, महेंद्र मलिये, भास्कर धोत्रे, श्रीकांत पातोंड, अशोक सोनवणे, राहुल गायकवाड, भीमराव दिपके आणि चालक प्रशांत कमलाकर व देवानंद खरात यांनी बजावली. अकोला पोलिसांनी अत्यंत क्लिष्ट असलेला हा गुन्हा केवळ २४ तासांत उघडकीस आणल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
दारूच्या नशेत झाला वाद
दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मृत सचिन आणि दोन्ही आरोपींनी एकत्र दारू प्यायली होती. नशेत असताना त्यांच्यात आपसात कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात दोघांनी मिळून सचिनचा खून केला व मृतदेह जंगलात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.