दाताळा येथे महिलेचा विनयभंग

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील दाताळा येथे एका ४० वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

दाताळा (ता.मलकापूर) येथील रहिवासी असलेली ४० वर्षीय महिला मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २९ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्या त्यांच्या मावस बहिणीसह घराजवळील ‘धोबी वाडा’ (गोदरी) भागात नैसर्गिक विधीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी गावातीलच आरोपी समाधान भोलनकर हा दारूच्या नशेत त्या ठिकाणी आला. त्याने फिर्यादी महिलेचा रस्ता अडवला आणि अश्लील मागणी करत तिचा विनयभंग केला. यावेळी फिर्यादीने त्याला कडक शब्दांत सुनावले, “मी तुला अशी दिसते काय? इथून गुपचूप निघून जा, नाहीतर आमच्या हाताचा मार खाशील,” असा इशारा दिला. वाद सुरू असतानाच आरोपी क्रमांक २, जानाबाई समाधान भोलनकर ही देखील घटनास्थळी पोहोचली. तिने आरोपीला समजावण्याऐवजी उलट फिर्यादी महिलेलाच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड घाबरली.

घडलेल्या प्रकारानंतर पीडित महिलेने तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले आणि आपबिती सांगितली. त्यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी २९ मार्च रोजी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम: ७४, ७५, ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील मपोहवा निता मोरे ह्या करत आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!