बुलढाणा,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्हा पोलीस दलात प्रदीर्घ काळ सेवा बजावल्यानंतर ७ पोलीस अधिकारी आणि अंमलदार ३१ मार्च २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या निमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात एका भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून जनसेवेचे व्रत जोपासणाऱ्या या निवृत्त वीरांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) बी. डी.पावरा, राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके आणि सपोनि श्रीकांत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात संजय समाधान राऊत (पोउपनि – पोस्टे शिवाजीनगर), अनिल बाबुराव पाटील (पोउपनि – नियंत्रण कक्ष बुलढाणा), राधेश्याम वैष्णव (सफौ – बि.डि.डि.एस), कृष्णा महादेव चौधरी (सफौ – पो.मु. बुलढाणा), सर्जेराव मुकिंदा तौर (सफौ – पोस्टे लोणार), रतन भिमराव वाणी (पोहेकॉ – पोस्टे लोणार) आणि पंढरीनाथ पुंडलीक जाधव (पोकॉ – पो.मु. बुलढाणा) या सात कर्मचाऱ्यांचा त्यांच्या योगदानाबद्दल पोलीस कल्याण शाखा (बुलढाणा) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात कुटुंबासह सत्कार करण्यात आला. तसेच सन्मानचिन्ह म्हणून शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, मोमेंटो, झाडांचे रोपटे, भेटवस्तू आणि साडी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या भावनिक सोहळ्यासाठी सेवानिवृत्तांचे सुमारे ५० कुटुंबिय व नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला पोलीस अंमलदार ज्योती राठोड, पोलीस अंमलदार सतिश सोनुने आणि महिला पोलीस अंमलदार रेखा बकाल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते, हे विशेष!