चिखली, (प्रतिनिधी): शहरातील खडकपुरा भागात देवाच्या पूजेच्या किरकोळ कारणावरून एका महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
चिखली शहरातील खडकपुरा परिसरात राहणाऱ्या वैष्णवी कृष्णा रक्ताडे (वय २६ वर्षे) या ३१ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास खडकपुरा भागातील मंदिरात गेल्या होत्या. यावेळी मंदिर परिसरात देवाच्या पूजेच्या कारणावरून आरोपी संतोष श्रीराम परसने (रा. खडकपुरा) याने त्यांच्यासोबत वाद घातला.
हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने वैष्णवी रक्ताडे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या मानेवर चाकूने वार केला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादीचा गळा दाबून त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. वैष्णवी रक्ताडे यांच्यावर हल्ला होत असताना बघून त्यांचे पती कृष्णा रक्ताडे यांचे मित्र शिवशंकर चव्हाण हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले. मात्र, आरोपीने त्यांच्यावरही हल्ला चढवला. आरोपी संतोष परसने याने शिवशंकर यांच्या डोक्यात दगड फेकून मारल्याने ते जखमी झाले. मारहाण केल्यानंतर “तुम्हा सर्वांना जीवे ठार मारीन” अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी वैष्णवी रक्ताडे यांनी चिखली पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आज १ एप्रिल २०२६ रोजी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, १२५(अ), ११५(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन चौहान हे करीत आहेत.