शेगाव परिसरात रेती माफियांची दादागिरी; महिला महसूल अधिकाऱ्याला न जुमानता रेतीसह टिप्पर पळवले!

शेगाव, (बुलढाणा): शासकीय नियमांची पायमल्ली आणि प्रशासनाचा धाक उरला नसल्याचे धक्कादायक वास्तव शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आले आहे. महसूल विभागाच्या महिला अधिकारी कर्तव्यावर असताना, त्यांच्या डोळ्यादेखत रेती माफियाने चोरट्या रेतीने भरलेले टिप्पर पळवून नेल्याची खळबळजनक घटना ‘टाकळी धारव’ शिवारात घडली आहे.

तिव्हाण आणि टाकळी धारव परिसराच्या महसूल अधिकारी (तलाठी) वैष्णवी नारायण भेले या ३० मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शेतसारा वसुलीसाठी जात होत्या. यावेळी त्यांना एमएच-२८-बीबी-६८२० क्रमांकाचे टिप्पर संशयास्पद रित्या जाताना दिसले. त्यांनी टिप्पर अडवून तपासणी केली असता, त्यात सुमारे दोन ब्रॉस बेकायदेशीर रेती (किंमत १६ हजार ४०० रुपये) आढळून आली.

महिला अधिकाऱ्याने टिप्पर थांबवून विचारपूस सुरू केली असता, तिथे स्थानिक लोकांची गर्दी झाली. अधिकारी लोकांशी बोलण्यात व्यस्त असल्याचे पाहून संधीसाधू टिप्पर चालकाने कायद्याची कोणतीही भीती न बाळगता, रेतीसह वाहन वेगाने पळवून नेले. दिवसाढवळ्या एका महिला अधिकाऱ्यासमोरून मुद्देमाल पळवून नेल्यामुळे रेती माफियांचे धाडस किती वाढले आहे, याचा प्रत्यय येतो.

याप्रकरणी वैष्णवी भेले यांच्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांत टिप्पर मालक आणि चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम: ३०३ (२), इतर कलमे ४८ (७), ४८ (८) महाराष्ट्र महसूल अधिनियम-१९६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अनिल बरींगे हे करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महसूल विभागात संताप व्यक्त केला जात असून, “रेती माफिया महसूल आणि पोलीस प्रशासनाला जुमानत नाहीत का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!