बुलढाणा,(प्रतिनिधी): राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून, बुलढाणा जिल्ह्याला आता नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. मागील काही काळापासून बुलढाणा जिल्ह्याची धुरा सांभाळणारे डॉ. किरण पाटील यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची नियुक्ती झाली आहे.
डॉ. प्रवीणकुमार देवरे हे २०१३ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. बुलढाणा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते पशुसंवर्धन आयुक्त (पुणे) या पदावर कार्यरत होते. प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले देवरे आता बुलढाणा जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत. नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्यासमोर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, शेतकरी समस्या, जिगाव प्रकल्प आणि पायाभूत सुविधांचा विकास यांसारखी महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. पुण्यातील आयुक्त पदाचा अनुभव पाहता, त्यांच्याकडून बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डॉ. देवरे लवकरच आपल्या पदाचा पदभार स्वीकारतील असे संकेत मिळत आहेत. डॉ. प्रवीणकुमार देवरे हे शिस्तप्रिय आणि अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजात काय बदल होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
