सिंदखेड राजा: कुंबेफळ येथे बालविवाह रोखला; नवरदेवासह ७ जणांवर गुन्हे दाखल

आनंद इंगळे

सिंदखेड राजा, (प्रतिनिधी): कायद्याने मुलीच्या लग्नाचे वय किमान १८ वर्षे असतानाही, अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणाऱ्यांविरुद्ध सिंदखेड राजा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कुंबेफळ येथील संत श्री सेवालाल महाराज मंदिरात सुरू असलेला हा बालविवाह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळला असून, नवरदेवाच्या आई-वडिलांसह एकूण ७ नामजद आणि इतर १० ते २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वाडेगाव येथील किरण (वय १६ वर्षे, ३ महिने) या अल्पवयीन मुलीचा विवाह डोंगरखंडाळा येथील लक्ष्मण विजय पवार याच्याशी लावून दिला जात होता. २ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.१५ ते ५ वाजेच्या सुमारास कुंबेफळ येथील सेवालाल महाराज मंदिरात हा विवाह सोहळा पार पडत होता. या घटनेची माहिती मिळताच कुंबेफळचे ग्रामपंचायत अधिकारी अमित राम जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत खातरजमा केली. मुलीची जन्म तारीख १२ सप्टेंबर २००९ असल्याने ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी लक्ष्मण विजय पवार (नवरदेव), विजय नरसिंग पवार (वराचे वडील), अनिता विजय पवार (वराची आई), उत्तम मागो चव्हाण (वराचा मामा), उषा राजाभाऊ चव्हाण (वधूची आई), अंकुश मोतीराम आडे (वधूचा मावसा), पुष्पा अंकुश आडे (वधूची मावशी) यांच्यासह लग्नाला उपस्थित असलेल्या इतर १० ते २० महिला व पुरुषांवर सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात कलम ९, ११ बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ सह भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार अरुण मोहिते हे करीत आहेत. “बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. समाज सुजाण होत असला तरी अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना द्यावी,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!