अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत गंभीर घटना समोर आल्या आहेत. यामध्ये मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली असून, बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एक २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण
मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणावरून किंवा लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
फिर्यादी सत्यभामा केशव पायघन (वय ४० वर्षे), रा. अंजनी बुद्रुक यांनी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यांची मुलगी वैष्णवी पायघन (वय १५ वर्षे १० महिने) हिला आरोपी गजानन हनुमान चंदनशिव (रा. अंजनी बुद्रुक) याने फुस लावून पळवून नेले.
याप्रकरणी फिर्यादीच्या रिपोर्टवरून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार हे करत आहेत.
बाजार करायला गेलेली विवाहिता बेपत्ता
दुसरी घटना बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून, खुपगाव येथील एक विवाहिता घरातून बाजार करण्यासाठी बाहेर पडली असता अद्याप घरी परतलेली नाही.
गणेश गजानन डुकरे (वय २४ वर्षे) रा. खुपगाव यांची बहीण अश्विनी मंगेश खेडेकर (वय २७ वर्षे) रा. अंत्री खेडकर, ह.मु. खुपगाव ही ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास “बुलढाणा येथे बाजार करण्यासाठी जाते” असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, रात्र होऊनही ती परतली नाही. नातेवाईक, गावकरी आणि तिच्या पतीकडे शोध घेतला असता तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. अश्विनीची उंची १६५ सेमी, वर्ण गोरा, चेहरा लांबट असून तिने अंगात लाल रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची लेगीज, कानात पिवळ्या धातूचे फुल, पायात सँडल घातलेली आहे. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार सोनुने हे करीत आहेत.