नराधम शिक्षकाचे शाळेत काळं कृत्य! चिमुकल्या मुलींना विवस्त्र करून केली छेडछाड; लोणी गवळीत उद्रेक, नराधमाला गावचा चोप तर शिक्षण विभागाने केले निलंबित

मेहकर,(प्रतिनिधी): विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या आणि समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या ‘गुरु’ या शब्दाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला लाजवणारी घटना मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथे उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम शिक्षकाने निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना आपल्या पद आणि वयाची मर्यादा ओलांडून अल्पवयीन विद्यार्थिनींशी घृणास्पद गैरवर्तन केले. या नराधमाने चिमुकल्या मुलींना विवस्त्र करून त्यांची छेडछाड केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला असून, या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरून गेला आहे. दरम्यान, नराधम शिक्षकाला शिक्षण विभागाने निलंबित केल्याची माहिती आहे.

लोणी गवळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. हा शिक्षक वर्गातील पाचवी आणि सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना टार्गेट करत होता. शिक्षणाचे धडे देण्याऐवजी हा विकृत शिक्षक विद्यार्थिनींना निर्जन ठिकाणी किंवा रिकाम्या वर्गात बोलावून त्यांना विवस्त्र व्हायला सांगत असे. केवळ एवढ्यावरच न थांबता, त्याने अनेकदा या मुलींशी अश्लील चाळे आणि छेडछाड केल्याचे पीडित मुलींनी “सर आम्हाला कपडे काढायला सांगतात,” असे आपल्या पालकांना सांगितले. हे शब्द ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. हळूहळू इतरही मुलींनी धाडस करून आपल्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला. निवृत्तीला केवळ काही महिने शिल्लक असलेल्या या शिक्षकाच्या मनात एवढी मोठी विकृती दडली असेल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.

पेटलेल्या गावाने शिक्षक भरचौकात धुतला

ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि लोणी गवळीतील ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. संतप्त गावकऱ्यांनी आणि पालकांनी थेट शाळा गाठली. आपल्या लेकींच्या अस्मितेशी खेळणाऱ्या त्या नराधम शिक्षकाला गावकऱ्यांनी जाब विचारला. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या शिक्षकाची गावकऱ्यांनी चांगलीच धुलाई केली. संतापलेल्या जमावाने या नराधमाला चोप देत ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत आणले. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून “अशा नराधमाला फाशी द्या,” अशी मागणी करत महिलांनी आक्रोश केला.

डोणगाव पोलिसांची धाव, शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या

घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशनचे पथक तातडीने लोणी गवळी गावात दाखल झाले. गावकऱ्यांच्या तावडीतून शिक्षकाला सोडवून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संतप्त जमावाचा रोष पाहता गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडित मुलींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, संबंधित शिक्षकावर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षण क्षेत्राला लागलेली ही ‘कीड’ कधी संपणार?

ज्या शाळेला आपण ‘सरस्वतीचे मंदिर’ मानतो, तिथेच जर नराधम बसलेले असतील, तर पालकांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवायचे कसे? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हा शिक्षक निवृत्तीच्या काळात सन्मानाने घरी जाण्याऐवजी जेलच्या सळ्या मोजणार आहे. मात्र, या घटनेमुळे त्या चिमुकल्यांच्या मनावर जो आघात झाला आहे, त्याची भरपाई कोण करणार?

कठोर कारवाईची मागणी; गावकऱ्यांचा इशारा

लोणी गवळी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर या शिक्षकावर कडक कारवाई झाली नाही आणि त्याला सेवेतून तात्काळ बडतर्फ केले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासातील ही एक अत्यंत काळी घटना मानली जात असून, संपूर्ण जिल्ह्यातून या नराधम शिक्षकाचा निषेध केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!